अनधिकृत होर्डिंग्सवर चंद्रपूर मनपा तर्फे कारवाईस सुरवात

चंद्रपूर २६ फेब्रुवारी –  शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्सवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले आहेत. अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून या करीता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही अश्या होर्डिंग्जवर कारवाई करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत महापौरांनी सहायक आयुक्त तथा अधिकाऱ्यांना दिले.
उपमहापौर राहुल पावडे व स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील अनधिकृत हार्डिंग्जवर गंभीरतेने चर्चा करण्यात आली. शहरात विविध जागी डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर लागलेले आहेत. यातील अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून या करीता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.
महानगरपालिका हद्दीत अश्या स्वरूपाचे  डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर  उभारतांना मनपाकडून रीतसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते, मात्र यातील अनेकांनी टॅक्स सुद्धा भरलेला नाही तसेच बऱ्याच ठिकाणी मनपाकडून परवानगीही घेण्यात आलेली नाही. अश्या अनधिकृत बॅनर, होर्डिंग्सची मुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतच आहे शिवाय मनपाचे आर्थिक नुकसानही होत आहे. काही ठिकाणी धोकादायक इमारतींवर होर्डिंग्ज आहेत
यापुर्वी नगररचना विभागातर्फे अश्या अवैध होर्डिंगचा सर्व्हे करण्यात आला होता. पाहणी केल्यानंतर संबंधितांना धारकांना नोटीस बजावण्यात आल्या, मात्र त्यानंतरही होर्डिंगधारकांनी दुर्लक्ष केल्याने आता मनपातर्फे कडक कारवाई केल्या जात असुन होर्डिंग धोरण निश्चित झाल्यावरच नवीन होर्डिंग्जला परवानगी देण्यात येणार असल्याचे  उपमहापौर पावडे यांनी सांगितले तर स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी शहर सुशोभीकरणाच्या दृष्टीने अनधिकृत होर्डिंग हटविण्याच्या कारवाईस गती देण्यास सांगितले.
याप्रसंगी उपायुक्त श्री. अशोक गरोटे, श्री. विशाल वाघ, सहायक आयुक्त. श्री. धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, सौरभ गौतम, प्रतीक देवतळे, राहुल भोयर, सुरेश माळवे, राहुल पंचबुद्धे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here