दडपशाहीच्या सरकारविरोधात नव्या क्रांतीची मशाल पेटवा: विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा समारोप

चंद्रपूर : देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर देशाच्या प्रगतीची पायाभरणी ही काँग्रेस पक्षाने केली. देशात शैक्षणिक, औद्योगिक क्रांती घडविली. खऱ्या लोकशाहीच्या धोरणातून देशाचा विकास साधला. परंतु, सध्याचे सत्ताधारी सर्वसामान्य नागरिकांसमोर श्रेयाचा खोटा इतिहास ठेवत आहे. त्यामुळे अशा दडपशाही सरकारशी लढा देण्यासाठी पुन्हा नव्या क्रांतीची मशाल पेटविणे काळाची गरज आहे. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या थोर नेत्यांच्या काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या आझादी गौरव पदयात्रेचा रविवारी (ता. १४) समारोप झाला. यावेळी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार बोलत होते. भर पावसात काढण्यात आलेल्या वाहन रॅलीत शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना स्मरण करण्यासाठी आझादी गौरव पदयात्रा काढण्याची सूचना केली होती. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत शहरातील विविध प्रभागात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.
माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनात ही पदयात्रा काढण्यात आली. ९ ऑगस्टला पठाणपुरा, विठ्ठल मंदिर, बिनबा गेट, एकोरी मंदिर, मिलन चौक, १० ऑगस्टला कस्तुरबा चौक, जोडदेऊळ, हनुमान खिडकी, भिवापूर, महाकाली, अंचलेश्वर, दादमहल, ११ ऑगस्टला मातोश्री विद्यालय तुकुम, एसटी वर्कशाप, गुरुद्वारा, विवेकनगर, शास्त्रीनगर, सीएचएल, शहर वाहतूक शाखा कार्यालय, १२ ऑगस्टला जनता महाविद्यालय, साईबाबा मंदिर, गजानन मंदिर, वडगाव, आकाशवाणी, सुमित्रनगर, १३ ऑगस्टला डॉ. आंबेडकर महाविद्यालय, जटपुरा गेट, सिस्टर कॉलनी, रहेमतनगर, घुटकाळा, जयंत टॉकीज, १४ ऑगस्टला बसस्थानक, रेल्वेस्थानक, बीएमटी चौक, अष्टभुजा, बंगाली कॅम्प, एमईएल ते परत बसस्थानक, नेताजी चौक ते लालपेठ एरिया सभा, नेताजी चौक या परिसरातून पदयात्रा काढण्यात आली.
आज पदयात्रेच्या समारोपानिमित्त कस्तुरबा चौकातून वाहन रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत सहभागी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदेमातरम, हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई.. हम सब भाई भाई, अशा घोषणा दिल्या. पदयात्रेत आणि वाहन रॅलीत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता अमृतकर, शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अडूर यांच्यासह
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभागासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here