चंद्रपुरात उद्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

लोकअदालतीत तडजोडीसाठी 10 हजार प्रकरणे

चंद्रपूर दि. 6 मे:: चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दि. 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये सुमारे 10 हजार प्रकरणे आपसी तडजोडीने ठेवण्यात येत आहे. विधिज्ञ, पक्षकार व नागरीकांनी या लोक अदालतीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता वि. अग्रवाल यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबीत दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन. आय अॅक्ट (धनादेश न वटणे), बँकांची कर्ज वसूली आदी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद (विविह – विच्छेदन वगळता), इलेक्ट्रिसिटी अॅक्टचे समझोता योग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रि-लिटिगेशन) प्रकरणे, महसूल, पाणीपट्टी, वीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात येत आहे. त्यामध्ये 3890 प्रकरणे , 6010 प्रि-लिटिगेशन व अन्य गुन्हाकबुली प्रकरणांचा समावेश असेल.

लोकअदालतीमध्ये ज्यांना न्यायालयात प्रत्यक्ष येणे शक्य नाही, अशा पक्षकारांना ऑनलाइन पद्धतीने लोक अदालतीत सहभाग नोंदविता येणार आहे. राज्य विधी सेवा प्राधिकरणाने यासाठी ‘सामा’ या कंपनीची मदत घेतली आहे. सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये चंद्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण आयोग कार्यालय सहभागी होत असून सदर कार्यालयातील तडजोड पात्र प्रकरण 7 मे रोजीच्या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा आयोगाचे अध्यक्ष अतुल आळशी, आयोगाच्या सदस्या कल्पना जांगडे (कुटे), कीर्ती वैद्य (गाडगील) यांचे सहकार्य लाभत आहे. त्यासाठी लोकअदालत पॅनलची बैठक व्यवस्था ग्राहक आयोगाचेच कार्यालयात करण्यात येत आहे.

सदर लोकअदालतीनिमित्य वाहतूक विभागाची प्रिलिटीगेशन प्रकरणे ठेवण्याबाबत त्या विभागाने ऑनलाइन पद्धतीने कार्यवाही केली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन आदीबाबत सूचनापत्रे संबंधित व्यक्तींना मोबाईलवर पाठविले आहे. दंड रक्कम ऑनलाईन भरण्यासाठी त्यामध्ये लिंक सुद्धा दिली आहे. नागरिकांनी या सुलभ पद्धतीचा वापर करून वेळ, पैसाव श्रमाची बचत करण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here