कुठे गेला विकास, शहर झाले भकास…!

चंद्रपूर मनपातून भ्रष्ट भाजप सरकार जाण्याचा आनंदोत्सव

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जनतेला विकासाची स्वप्ने दाखवून महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी शहर भकास केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून विकास केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, शहरात त्यांनी केलेला विकास शोधूनही सापडत नाही. मागील पाच वर्षांत अनेक भ्रष्टाचाराचे आरोप या सत्ताधाऱ्यांवर आहेत. मनपातील भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. २९) चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने कस्तुरबा चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर गांधी चौकात मनपासमोर फटाके फोडून, पेढे वितरित करण्यात आले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यावेळी भाजपच्या वतीने शहरातील नागरिकांना शहराचा विकास, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन अशी अनेक आश्वासने दिली होती. शहरातील मतदारांनी शहराचा विकास होईल, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन मिळेल, या आशेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले. परंतु, सत्तेत आल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले. केवळ स्वताचा विकास साधण्यावर पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले. त्यामुळे कोरोना काळात भोजन घोटाळा, कचरा संकलन टेंडर घोटाळा, प्रसिद्धी घोटाळा, रस्ते बांधकाम घोटाळा, शासकीय निधीचा दुरुपयोग, आझाद बगीचा सौंदर्यीकरण कामाच्या रकमेत वाढ असे अनेक प्रताप या सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. शहरातील अनेक प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. परंतु, अमृत योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. त्यामुळे आजही अनेक प्रभागातील नागरिकांना विहिरी, बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

मनपातील भ्रष्ट भाजप सरकारचा २९ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून मनपात प्रशासक बसणार आहे. मागील पाच वर्षांपासून शहराला लागलेले ग्रहण आजपासून सुटणार असल्याने काँग्रेसच्या वतीने आनंदोत्सव करण्यात येत असल्याचे मत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी व्यक्त केले. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक कॉंग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी विभाग, अनुसूचित जाती विभाग, इंटक काँग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, सेवादल, किसान सेल, उत्तर भारतीय सेल यांच्यासह इतर सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here