ग्राहकांनो, विजेचा वापर काटकसरीने करा!

महावितरणचे सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आवाहन

मुंबई, दि. २८ मार्च: गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून मागणीप्रमाणे तब्बल २४००० ते २४५०० मेगावॅट विजेचा सुरळीत व विनाव्यत्यय वीजपुरवठा करण्यात येत आहे. मात्र उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याने ही मागणी यापुढे २५ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सर्वच ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यात समतोल राखण्यासाठी विशेषतः सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

राज्याच्या इतिहासात प्रथमच विजेच्या मागणीने तब्बल २८ हजार मेगावॅटचा उंबरठा ओलांडला आहे. यामध्ये महावितरणच्या कार्यक्षेत्रात विजेच्या मागणीने गेल्या पंधरवड्यापासून सर्व उच्चाकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत विजेची कमाल मागणी २० हजार ८०० मेगावॅटवर गेली होती. मात्र ही मागणी यंदा तब्बल ३६०० मेगावॅटने वाढली आहे व अधिक वाढण्याची शक्यता आहे. आजवरच्या सर्वाधिक मागणीनुसार महावितरणने गुरुवारी (दि.२४-मार्च) मुंबई वगळता उर्वरित राज्यभरात महाविक्रमी २४ हजार ४०० मेगावॅट विजेचा सुरळीत पुरवठा केला. त्यानंतर शुक्रवारी (दि. २५) २४ हजार ६५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महावितरणकडून सर्वाधिक मागणीनुसार वीजपुरवठा करण्यात येत आहे, हे विशेष.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील कोळशाच्या टंचाईमुळे विजेच्या उपलब्धतेमध्ये तूट निर्माण झाली होती. परंतु विजेच्या मागणीत मात्र फारशी वाढ झालेली नव्हती. तथापि सद्यस्थितीत कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक प्रकल्पांमधून प्राप्त होणाऱ्या वि‍जेमध्ये २०००-३००० मेगावॅटपर्यंत घट झाली आहे. याउलट विजेच्या मागणीत मात्र ऐतिहासिक व अकल्पित वाढ झालेली आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणीमध्ये ताळमेळ साधणे महावितरणसाठी जिकिरीचे झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सद्यस्थितीत पुरेसा कोळसा नियमित उपलब्ध व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवर देखील प्रयत्न सुरु आहेत.

अभूतपूर्व विजेच्या मागणीमुळे वीजखरेदी देखील वाढविण्यात आली आहे. महावितरणकडून प्रामुख्याने कोळशावर आधारित विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. महानिर्मिती, एनटीपीसी व एनपीसीआयएल तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्लू इत्यादी कंपन्यांसोबत महावितरणने एकूण २१ हजार २६९ मेगावॅट वीजखरेदीचा करार केला आहे. मात्र कोळशाची टंचाई व अन्य कारणांमुळे सद्यस्थितीत फक्त १५ हजार ५५० मेगावॅट एवढीच वीज उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे सौर व इतर अपांरपरिक ऊर्जास्त्रोतांद्वारे सध्या ३५०० ते ४००० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. तरीही विजेची वाढती मागणी व उपलब्ध वीज यामध्ये तूट निर्माण होत असल्याने विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला खुल्या बाजारातून सद्यस्थितीत सुमारे २००० मेगावॅट वीज खरेदी करावी लागत आहे. इतर राज्यांमध्येही सध्या विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. परिणामी खुल्या बाजारातील विजेचे दर देखील वाढले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून विजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरण मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. सध्या वीजबिलांच्या थकबाकीची वसूली सुरु असली तरी त्यास थकबाकीदारांकडून पुरेसा प्रतिसाद नाही. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून सध्या विजेची मागणी वाढली आहे. सोबतच प्रखर उन्हामुळे इतर ग्राहकांचा वीजवापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमिवर विजेची खरेदी आणि आर्थिक ताळमेळ साधण्यात महावितरणची कसरत सुरु आहे. सुमारे २४००० ते २४५०० मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करताना महावितरणच्या चोख नियोजनामुळे कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करावे लागले नाही, हे उल्लेखनीय.

देशभरात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोळशाचा अतिवापर व त्यातून संभाव्य कोळसा टंचाईचे सावट तसेच कोयनेतील पाणीवापरावर मर्यादा असल्याने येत्या जूनपर्यंत पारंपरिक वीजनिर्मितीचे पर्याय जपून वापरावे लागणार आहे. त्यामुळे मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल साधण्यासाठी तसेच विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळात भारव्यवस्थापनामध्ये अडथळे येऊ नये यासाठी घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर सर्व वीजग्राहकांनी विशेषतः सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here