चंद्रपुरात पाच सोनोग्राफी व चार गर्भपात केंद्रास नोटीस

एक गर्भपात केंद्र तात्पुरते निलंबित

चंद्रपूर दि. 9 मार्च : वर्धा जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणाची गंभीरता पाहता चंद्रपूर जिल्ह्यात, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील सोनाग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. सदर मोहिमेंतर्गत त्रृटी आढळलेल्या पाच सोनोग्राफी केंद्रास व चार गर्भपात केंद्रास नोटीस देण्यात आली असून एक गर्भपात केंद्र तात्पुरते निलंबित करण्यात आली आहे. त्रृटींची पुर्तता केल्याचा अहवाल संबंधित केंद्रांकडून प्राप्त झाल्यानंतर शल्य चिकित्सक कार्यालयाची चमू फेरतपासणी करून प्राप्त अहवालाची शहानिशा करणार आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत 20 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत प्रत्येकी तीन सदस्यांच्या एकूण चार समित्या गठीत करून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान जिल्ह्यातील 50 सोनोग्राफी केंद्र व 33 गर्भपात केंद्राच्या तपासणीचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. तसेच ज्या तालुक्यात सोनोग्राफी व गर्भपात केंद्र अस्तित्वात आहे, त्या सर्व केंद्रांना भेटी देऊन पीसीपीएनडीटी / एमटीपी कायद्यानुसार सखोल तपासणी करण्यात आली.

या मोहिमेंतर्गत काही त्रृटी आढळल्यामुळे पाच सोनोग्राफी केंद्रास व चार गर्भपात केंद्रास नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच एक गर्भपात केंद्र तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. काही सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांनी त्रृटींची पुर्तता केली असून नोटीस बजावण्यात आलेल्या केंद्रांकडून समाधानकारक पुर्तता न केल्यास सदर केंद्रांवर आणखी कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here