चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी घेतला आढावा

चंद्रपूर दि. 5 मार्च : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी पोलिस विभागाने अतिशय गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असलाच पाहिजे. तसेच कोणाच्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यात पोलिसांचा दरारा दिसू द्या, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पोलिस यंत्रणेला दिले.
पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या मंथन सभागृहात जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे आदी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीवर जिल्ह्याची प्रतिमा निर्माण होत असते, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, अवैध कोळसा वाहतुकीतून गुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे याकडे केंद्रीय तपाय यंत्रणांचे लक्ष आहे. जिल्ह्याची प्रतिमा मलीन होणार नाही, यासाठी अवैध कोळशाची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे. कोणताही राजकीय दबाव आला किंवा कोणाचाही फोन आला तर त्याची स्टेशन डायरीला नोंद करा. अवैध कोळसा वाहतुकीबाबत स्पेशल स्कॉड तयार करून धडक कारवाई करावी.
एमपीडीए कायद्यांतर्गत महसूल विभागाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे सर्व उपविभागीय अधिका-यांनी त्वरीत निकाली काढावी. आपापल्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची यादी करा. तसेच कोणताही गुन्हेगार सुटणार नाही, याबाबत पोलिसांनी गांभिर्याने काम करावे. अवैध दारु, बनावट दारू प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व ठाणेदारांनी चोख कामगिरी करावी. बोगस कंपन्या स्थापन करून आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. सर्वसामान्य लोकांचा घामाचा पैसा आणि जीवनभराची मेहनत वाया गेली तर ते कुटुंब पूर्णपणे उद्वस्त होते. अशा प्रकरणांचा छडा लावून दोषींवर कारवाई करा.
पुढे श्री. वडेट्टीवार म्हणाले, अल्पवयीन मुलींची प्रकरणे अतिशय संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे आहे. संबंधित पालकांची तक्रार आली तर पोलिस यंत्रणा कामाला लागली पाहिजे. यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. तसेच मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस विभागाने ॲप सुरू करावे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. यात दोषसिध्दी होणे आणि कारवाई होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवावे लागेल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही लावण्यासाठी पोलिस विभागाला निधी उपलब्ध करून दिला जाईल. सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला गती येते. पर्यायाने वेळेत तपास होऊन गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सीसीटीव्हीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, संबंधित ठाणेदार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here