चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या निर्बंधामध्ये अधिक शिथिलता

चंद्रपूर दि. 4 मार्च : जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या निर्बंधामध्ये अधिक शिथिलता देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अजय गुल्हाने यांनी जारी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथिलतेकरीता राज्य सरकारने चार प्रकारचे मापदंड लावले. यात लसीकरणाचा पहिला डोज 90 टक्क्यांपेक्षा जास्त, दुसरा डोज 70 टक्क्यांपेक्षा जास्त, रुग्णालयातील कोविड रुग्णांची संख्या 40 टक्क्यांपेक्षा कमी आणि जिल्ह्याचा पॉझेटिव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक होते. वरील चारही मापदंडामध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

जिल्ह्यात पहिल्या डोजचे प्रमाण 97 टक्के, दुसरा डोज घेणा-यांचे प्रमाण 78 टक्के, जिल्ह्याचा पॉझेटिव्हीटी रेट 0.36 टक्के तर आजघडीला ॲक्टीव्ह 15 रुग्णांपैकी केवळ एक जण रुग्णालयात भरती असल्यामुळे हे प्रमाण केवळ सहा टक्के आहे. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या चारही निकषात जिल्हा अव्वल ठरल्यामुळे निर्बंधातून सुटका झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण यंत्रणेने हे यश मिळविले आहे.

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात अधिक शिथिलता लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे.

पूर्ण लसीकरणाची आवश्यकता असलेल्या आस्थापना / सेवा : सर्वसामान्य जनेतला सेवा देणा-या सर्व आस्थापना, होम डिलीवरी करणारा वर्ग, सार्वजनिक वाहतुक सेवा उपभोगणारे सर्व नागरीक, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षणीय स्थळे, रेस्टॉरंट, क्रीडाकलाप, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी कार्य करणारे अधिकारी कर्मचारी तसेच थेट भेट देणारे अभ्यागत / नागरीक, शासकीय, अशासकीय, निमशासकीय आस्थापना येथे कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी तसेच भेट देणारे अभ्यागत नागरीक, औद्योगिक व वैज्ञानिक संस्था / प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी.

50 टक्के क्षमतेने सुरु राहणा-या बाबी : सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक व इतर उत्सव / कार्यक्रम, लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर संमेलन नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने सुरू. तसेच उपस्थित व्यक्तिंची संख्या एक हजार पेक्षा जास्त होत असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना सुचित करणे अनिवार्य असेल.

नियमित व पूर्ण क्षमतेने सुरू राहणा-या बाबी : शासकीय/ अशासकीय/ निमशासकीय, औद्योगिक व वैज्ञानिक संस्था / प्रशिक्षण संस्था व इतर सर्व प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय उद्यान, बाग-बगीचे, प्रेक्षणीय / पर्यटन स्थळे, अम्युझमेंट पार्क / थीम पार्क, जलतरण तलाव, जलउद्याने, किल्ले, इतर मनोरंजन स्थळे, ब्युटीपार्लर, सलून, हेअर कटींग सलून, वेलनेस सेंटर, जीम, रेस्टॉरंट, हॉटेल, उपहारगृहे, सिनेमागृह, नाट्यगृह, शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग, अंगणवाडी आदी तसेच वरील मुद्यात समाविष्ट नसलेल्या इतर सर्व बाबी नियमित वेळेनुसार पूर्ण क्षमतेने सुरू राहील.

आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवास करण्यासाठी पूर्ण लसीकरण किंवा 72 तासांमधील आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे अनिवार्य आहे.

सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 4 मार्च 2022 च्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here