नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी

चंद्रपूर : काँगेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नंदू नागरकर हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी ४ मार्चला आझाद बाग परिसरात सकाळी फिरायला आले होते. त्यानंतर ते घरी जात असताना काही युवकांनी रस्त्यात अडवून त्यांना मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना निंदनीय आहे. या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास करून हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. या संबंधीचे निवेदन चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना सादर करण्यात आले आहे.

एखाद्या लोकप्रतिनिधीवर भरदिवसा असे हल्ले होत असतील, तर शहरातील सर्वसामान्य जनता खरचं सुरक्षित आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी नंदू नागरकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अन्यथा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष पप्पू सिद्दीकी, एनएसयुआयचे कुणाल चहारे, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, नौशाद शेख, कासिफ अली यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here