महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ साठी निवड

प्रधानमंत्र्यांनी साधला बालकांशी संवाद 

नवी दिल्ली, दि. २4 : महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले तसेच, प्रातिनिधिक बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये देशातील 29 बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील जळगाव येथील शिवांगी काळे (६) , पुणे  येथील जुई केसकर (1५) ,मुंबई येथील जिया राय (1३)  आणि नाशिक  येथील स्वयंम पाटील (1४) या बालकांचा समावेश आहे. पदक, 1 लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र  असे  या  पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्रातील बालकांच्या प्रतिभेचा सन्मान

जळगाव येथील शिवांगी काळे हिची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासठी  निवड झाली. लहान वयातच धाडस आणि समयसूचकतेचा परिचय देत विजेच्या धक्क्यापासून शिवांगीने आपल्या आई व बहिणीचे प्राण वाचविले.

पुणे  येथील जुई केसकर  हिची  नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. जुई ने पार्किन्सन रोगग्रस्तांना उपयुक्त ठरतील असे मोजे सदृष्य उपकरण तयार केले असून यास ‘जे ट्रेमर ३ जी’ असे  नाव देण्यात आले आहे.

मुंबई येथील रिया राय हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. 13 वर्षीय रिया ही दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत  तिने ओपन वाटर पॅरा स्विमींग आणि ओपन वाटर स्विमींग मध्ये  जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे.

नाशिक  येथील स्वयंम पाटील याची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. स्वयंम ने वयाच्या १० व्या वर्षी  ५ कि.मी. अंतर पोहून तर १३ व्या वर्षी १४ कि.मी. अंतर पोहून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कला व संस्कृती,शौर्य, नवसंशोधन, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा या  सहा श्रेणींमध्ये ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’-२०२२ पटकाविणाऱ्या २९ बालकांना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये २१ राज्य व केंद्र प्रदेशातील १५ मुलं आणि १४ मुलींचा समावेश होता. या कार्यक्रमातच पंतप्रधानांनी वर्ष २०२१ च्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या  ३२ बालकांना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले.
प्रधानमंत्र्यांचे मार्गदर्शन           
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे वर्ष २०२२ चे पंतप्रधान ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती  इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई देखील यावेळी उपस्थित होत्या.
पुरस्कार विजेत्या बालकांना  देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात हा पुरस्कार मिळत असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार आयुष्यभर स्मरणात राहणार असल्याचे प्रधानमंत्री यावेळी  म्हणाले. या पुरस्कारासोबत तुम्हा सर्व बालकांवर मोठी जबाबदारी आली आहे. मित्र, कुटुंबिय, समाज अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या  आहेत, तेव्हा या अपेक्षांचे ओझे वाटून न घेता त्यातून प्रेरणा घ्या असेही प्रधानमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here