लाखमोलाचे जीव वाचवा सुरक्षिततेचे नियम पाळा, विद्युत अपघात टाळा!    

चंद्रपूर:अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतकीच वीज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर विद्युत अपघात घडून नुकसान होऊ शकते. सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर हे अपघात टाळता येतात. ११ ते १७ जानेवारीदरम्यान दरवर्षी विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.
वीज डोळ्यांनी दिसत नाही. तिचा परिणाम फक्त जाणवतो. विजेचा शॉक चटकन बसू शकतो. परंतु एखाद्या ठिकाणी विजेपासून धोका आहे हे आपणास वरून समजत नाही. त्याकरिता कुठलेही काम करताना ते काळजीपूर्वक करावे. महावितरणकडून अधिकृत जोडणी घेऊनच वीज वापरावी. आकडे टाकून किंवा अनधिकृतरीत्या वीज वापरणे अपघातास निमंत्रण देऊ शकते. शेतीच्याजंगला जनावरांच्या सुरक्षेसाठी कुंपनात विद्युत प्रवाह सोडण्यात येतो व त्यामुळे रानडुकरे, हरणे, निलगाई, अस्वल,यांच्यासोबतच राष्ट्रीय संपत्ती असलेले वाघांसारखे प्राणी सोबतच मनुष्यांनाही प्राणांतिक अपघात होवून अनेक कुटुंबे उघडयावर पडली आहेत. कुलर्सचा वापर काळजी न घेता करणे, बेकायदेशिरपणे विद्युत वाहिण्याखाली बांधकाम करणे, बेकायदेशिरपणे शेतीच्या कुंपनात वीजप्रवाह सोडणे, बेकायदेशिरपणे शिकारीसाठी ११ किव्हो वीजवाहिनीवर तार टाकून शिकार करणे , बेकायदेशिरपणे आकडे बाकून वीज चोरी करणे यामुळेही वीजसुरक्षा धोक्यात येते.सर्व विद्युत वायर्स, केबल्स व आयएसआय प्रमाणित योग्य क्षमतेचे साहित्य वापरणे केव्हाही प्रथम पर्याय असावा. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नका. वायरिंगसाठी योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरा; जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. सर्व वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉडची अर्थिंग कार्यक्षमपणे लावून घ्या. वायरिंगचे साहित्य, विद्युत उपकरणे, स्विचेस ही आयएसआय चिन्ह असलेली किंवा गुणवत्ता नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली घरगुती उपकरणेच वापरा. उदा.मिक्सर, टोस्टर, ग्राइंडर, वॉशिंग मशीन इत्यादी. अर्थ लिकेजपासून होणारा धोका टाळण्यासाठी ईएलसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) वापरा. मीटर रूम स्वच्छ, प्रकाशित, मोकळी व हवेशीर ठेवा. तिचा वापर स्टोअर रूम म्हणून करू नका तसेच तिथे ज्वालाग्राही वस्तू ठेवू नका. अर्थिंगची व्यवस्था असलेलीच थ्री-पिन प्लगची विद्युत उपकरणे खरेदी करा. न्यूट्रल वायरसाठी उघड्या वायरचा वापर न करता इन्सुलेटेड वायरचाच वापर करा. एका सॉकेटमध्ये मल्टी प्लग्ज/तारा घालू नका. ते धोकादायक असून, आगीस निमंत्रण देते. तात्पुरते लोंबकळते वायर्स लावू नका. योग्य पद्धतीचा अवलंब करा.
जोडणी दिलेले वायर्स, केबल्स वापरू नका. आपली वायरिंग व अर्थिंग वेळच्यावेळी तपासून घ्या. सॉकेटमध्ये खुली वायर काडीचा वापर करून न लावता, थ्री-पिन प्लग टॉपचा वापर करा. सर्व विद्युत ग्राहकांनी तसेच बांधकाम व्यावसायिकांनी विद्युत वायरिंग मान्यताप्राप्त, परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडूनच करून घ्यावी. १५ मीटरपेक्षा अधिक उंच इमारतींच्या बाबतीत विद्युत पुरवठा सुरू करण्यापूर्वी सदर इमारतीतील वायरिंग योग्य असल्याबाबत विद्युत निरीक्षकांकडून प्रमाणित करून घ्यावी. ते नियमानुसार बंधनकारक आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करा. विद्युतरोधक अग्निशामकाचा वापर करा. पाण्याचा वापर करू नका. विद्युतवाहक तारांचा वापर कपडे वाळवण्यासाठी करू नका. विजेच्या तारांखाली घरे अथवा कोणतेही बांधकाम करू नका. लिफ्ट मशीनरूममध्ये अनधिकृत व्यक्तीस प्रवेश देऊ नका. त्यामुळे धोका संभवतो. लिफ्ट मशीनरूममध्ये सीसीटीव्ही, इंटरनेट, टीव्ही केबलची उपकरणे ठेवू नये किंवा तेथील वीजपुरवठ्यास जोडू नयेत. त्यामुळे वीजपुरवठ्यात  अडथळा निर्माण होऊन लिफ्ट मध्येच बंद पडण्याचा धोका संभवतो.
वीजवाहिनीजवळ पतंग उडवू नका. त्यामुळे विजेचा धक्का बसण्याचा धोका संभवतो. वीजवाहिनीजवळच्या झाडांवर चढून फांद्या हलवू नका. विजेच्या खांबास जनावरे बांधू नका. शेतात किंवा जमिनीवर पडलेल्या वीजवाहिनीच्या तारांना स्पर्श करू नका. लिफ्टमध्ये १२ वर्षांखालील मुलामुलींनी एकट्याने जावू नये. ते धोकादायक आहे. लिफ्टमधून हात किंवा पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याने धोका संभवतो. मोबाईल चार्जिंग करताना लहान मुलांच्या स्पर्शापासून दूर ठेवा.
कुठल्याही विजेवर चालणाऱ्या; चालू उपकरणाशी उगाच खेळत बसू नये. वीज तपासून पाहण्याकरिता आपल्या हातांचा केव्हाही उपयोग करू नये. त्यासाठी टेस्टरसारखे उपकरण वापरावे. एखाद्या ठिकाणी विजेचा दाब किंवा प्रवाह तपासून पाहावयाचा असल्यास, त्या ठिकाणी दाब किंवा प्रवाह तपासण्याची योग्य अशी साधने वापरावीत. एखाद्या प्लगला जोडलेली प्लग पिन काढावयाची असल्यास तिच्या वायरला धरून कधीही ओढू नये. एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीस किंवा मालमत्तेस धोका उत्पन्न झाला तर ताबडतोब सूचना द्यावी.     वीजवाहक तार तुटून पडल्याचे नजरेस आल्यास ताबडतोब महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच १९१२, १९१२०, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावरही माहिती देऊ शकता. म्हणून लाखमोलाचे जीव वाचवा व सुरक्षिततेचे नियम कटाक्षाने पाळा व विद्युत अपघात टाळा असे अवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here