जीएसटी विभागाची मोठी कारवाई

२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

पुणे, दि. 21 : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राज्य कर अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार आफताफ रेहमानी याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. मे. अर्श स्टील कॉर्पोरेशन या कंपनीने वस्तू व सेवाकर कायदा 2017 याअंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या कंपनीच्या माध्यमातून आफताफ रेहमानी याने 200 कोटी रकमेची फक्त बिले देऊन 41 कोटी 95 लाखांचा आय. टी. सी. (इनपुट टॅक्स क्रेडिट) पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी बोगस कंपनीकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकातून सुमारे 27 कोटी 7 लाख रकमेचा परतावा प्राप्त करून घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. अप्पर राज्यकर आयुक्त, पुणे श्री. धनंजय आखाडे, राज्यकर सहआयुक्त, श्रीम. रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दत्तात्रय आंबेराव व सहाय्यक राज्यकर आयुक्त सचिन सांगळे यांच्या प्रयत्नातून ही अटक कारवाई करण्यात आली. विभागातर्फे ॲड. महेश झंवर यांनी काम पहिले असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here