‘कोव्हीड सुरक्षित वर्तणूक’ नियमांचे गांभिर्याने पालन करा – विभागीय आयुक्त लवंगारे

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा

चंद्रपूर दि. 16 डिसेंबर : कोरोना तसेच संभाव्य ओमॉयक्रॉन विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत 90 टक्के लोकांना लसीकरणाचा पहिला डोज तर 50 टक्के लोकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात लस हे प्रभावी अस्त्र असले तरी नागरिकांनी लसीकरणानंतरसुध्दा ‘कोव्हीड सुरक्षित वर्तणूक’ नियमांचे अतिशय गांभिर्याने पालन करावे, अशा सुचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबत उपाययोजना तसेच लसीकरणाचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. मिलिंद सोमकुंवर आदी उपस्थित होते.

कोव्हीड सुरक्षित वर्तणुकीबाबत वेगवेगळ्या आस्थापना, बाजारपेठा, औद्योगिक कारखाने, शासकीय कार्यालये तसेच संघटीत व असंघटीत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे, असे सांगून विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे म्हणाल्या, नागरिकांनी नियमित मास्क लावणे, लसीकरण झाले असेल तरच वरील ठिकाणांवर प्रवेश देणे आदी बाबी करणे अत्यावश्यक आहे. ज्या लोकांचा दुसरा डोजचा कालावधी आला आहे, अशा लोकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्या. लोकांच्या वेळेत लसीकरणासाठी त्यांच्या दारापर्यंत पोहचा. घरोघरी टीम पोहचल्या तरच 100 टक्के लसीकरण करणे शक्य होईल.

ज्या नागरिकांचा पहिला डोज आहे, त्यांना को-व्हॅक्सीन दिली तर लगेच 28 दिवसानंतर दुसरा डोज देता येतो. त्यामुळे अशा नागरिकांचे दोन्ही डोज लवकर पूर्ण होऊन जिल्ह्याची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. नवीन व्हेरियंट असलेल्या ओमॉयक्रॉन संदर्भात बाहेरून आलेल्या प्रवाश्यांवर लक्ष केंद्रीत करा. लक्षणे असल्यास त्वरीत नमुने घेऊन तपासणीकरीता पाठवा. सोबतच सारी / आयएलआयची तपासणी आणि सिरो सर्व्हेलन्स सुरू ठेवा. नागरिकांची ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते, अशा ठिकाणांवर पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी. जेणेकरून कोव्हीड सुरक्षित नियमांचे उल्लंघन होणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने अन्न व औषधी प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग व इतर विभागांची मदत घ्यावी. परिस्थिती लक्षात घेऊन आगामी काळात संस्थात्मक विलगीकरणाचे नियोजन करून ठेवा. जिल्हा परिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी असतात. या सर्वांचे लसीकरण झाले का, याबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आढावा घ्यावा. या महिन्याअखेर लसीकरण पूर्ण करण्यावर संपूर्ण यंत्रणेने भर द्यावा, अशा सुचना विभागीय आयुक्तांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, ज्या ठिकाणी लसीकरणाचे 200 पेक्षा जास्त लाभार्थी बाकी आहेत, अशा ठिकाणी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. नोडल अधिका-यांच्या टीममार्फत लसीकरणाच्या दोन – तीन दिवसांपूर्वी गावक-यांना अवगत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दुर्गम भागात कोलाम आणि गोंडी भाषा समजणारे नागरिक असल्यामुळे या भाषांमधूनसुध्दा जनजागृती करण्यात येत आहे. तसेच व्यापारी, किराणा, औद्योगिक संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या नियमित व्हीसीद्वारे बैठका घेऊन कोव्हीड सुरक्षित वर्तणुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात 16 पीएसए प्लाँटपैकी आठ पूर्ण झाले असून उर्वरीत या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here