
खासदार बाळू धानोरकर यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात नियमितपणे बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे बघून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी नियमित विजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना असावी, जे शेतकरी नियमित १०० टक्के वीजबिल भारतात त्यांना आता ५ टक्के सूट देण्यात येते. परंतु त्यांना आता २५ टक्के सूट देण्यात यावी अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. त्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही त्यांना ५० टक्के सूट देण्यात आली या निर्णयाचे देखील खासदार बाळू धानोरकर यांनी स्वागत केले.
बाबुपेठ येथे शनिवारी राजुरा, मुल, सावली, चंद्रपूर आणि चिमुर तालुक्यातील उपकेंद्राच्या आभासी पध्दतीने लोकार्पण झाले. त्याच कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर यांनी ही सूचना केली. याप्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्यासह महावितरणचे संचालक संजय ताकसांडे, प्र.संचालक (वाणिज्य) सतिश चव्हाण, संचालक भालचंद्र खंडाईत, प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता सुनील देशपांडे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र मोठे आहे. या जंगलात वाघ, बिबट यासह अन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. जंगलालगत असलेल्या गावांत वाघ, बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. वन्यजीव – मानव प्राणी संघर्षात गेल्या काही महिन्यांत शेकडो जणांचे बळी गेले. शेकडो नागरिक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेसुद्धा भीतीचे वाटते. वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमधील शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा, अशी सूचनाही खासदार बाळू धानोरकर यांनी केली