
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संदीप आवारी यांची अविरोध निवड झाली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात 11 ऑक्टोबर रोजी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समिती सभापती व महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रक्रिया सुरू झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून संदीप आवारी यांनी नामांकन दाखल केले होते. एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी संदीप आवारी यांची अविरोध निवड जाहीर केली. त्यानंतर
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. पुष्पा उराडे आणि उपसभापतीपदी कु. शितल मारोती कुळमेथे यांची अविरोध निवड झाली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहीते व महिला व बालकल्याण समितीच्या उपस्थित सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, नवनियुक्त तिन्ही पदाधिकाऱ्यांचे महापौर कक्षात स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मावळते स्थायी समिती सभापती रवि आसवानी, भाजपचे महानगर अध्यक्ष ङाॅ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.