
चंद्रपूर शहराच्या विकासासाठी जाणून घेणार चंद्रपूरकरांची मते
चंद्रपूर : मागील काही वर्षांत चंद्रपूर शहर बदलले आहे. लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. केवळ रस्ते, नाली, हा विकास नसून, चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास साधणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी, ९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात चंद्रपूरकरांचा ध्यास, चंद्रपूरचा विकास या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या कार्यक्रमात चंद्रपूर शहरातील सुजाण नागरिकांची मते, नवनवीन कल्पना, नवीन संकल्पना जाणून घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमात चंद्रपूर शहरातील सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला, समाजकारणी, राजकारणी, युवक, युवती या सर्वांनी सहभाग नोंदवून आपल्या स्वप्नातील चंद्रपूर शहर कसे असावे, या विषयीची मते नोंदवावी, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.