‘चंद्रपूरकरांचा ध्यास, चंद्रपूरचा विकास’ कार्यक्रमाचे आयोजन  

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पुढाकार 

चंद्रपूर : मागील काही वर्षांत चंद्रपूर शहर बदलले आहे. लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे.  केवळ रस्ते, नाली, हा विकास नसून, चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास साधणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूरकरांचा ध्यास, चंद्रपूरचा विकास या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढाकारातून ९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात चंद्रपूर शहरातील सुजाण नागरिकांची मते, नवनवीन कल्पना, नवीन संकल्पना जाणून घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

चंद्रपूर शहराला पाचशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहरात दिमाखाने उभ्या असलेल्या पुरातन वास्तू आजही त्याची साक्ष देत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही चंद्रपूर शहर व जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. मागील काही वर्षांत चंद्रपूर शहर बदलले आहे. रोजगारासाठी गावखेड्यातील अनेक नागरिक चंद्रपुरात आले. मिळेल ते काम करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले. त्यामुळे बघता बघता चंद्रपूर नगर कधी महानगर झाले ते कळलेच नाही. वाढती लोकसंख्या, आक्रसलेले रस्ते, आधुनिक सुविधांचा अभाव, पुढील पंचवीस वर्षाचे नसलेले नियोजन या साऱ्या बाबी शहराच्या बकालपणात भर घालत आहे.

त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाने शहराच्या विकासाची एक ब्लू प्रिंट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात चंद्रपूर शहरातील सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला, समाजकारणी, राजकारणी, युवक, युवती या सर्वांनी सहभाग नोंदविणे आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला चंद्रपुरातील सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या स्वप्नातील चंद्रपूर शहर कसे असावे, या विषयीची मते नोंदवावी, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकास आपल्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य याशिवाय शक्य नाही. त्यामुळे आपल्या सूचनांचे स्वागत आहे. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आपल्या मनातील नवीन योजना, नवीन संकल्पना मांडाव्या. जेणेकरून त्यावर विचार करून भविष्यात अंमलबजावणी करता येऊ शकते. 

– रितेश (रामू) तिवारी 
जिल्हाध्यक्ष 
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here