चंद्रपूरची शिल्पा बनली ‘मिसेस इंडिया’

अमेरिकेत २०२२ मध्ये होणाऱ्या जागतिक मिसेस वर्ल्ड स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

चंद्रपूर : शहरातील अरुण चिंतलवार-लता चिंतलवार यांची कन्या आणि सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. जी. एस. आडम यांच्या स्नुषा शिल्पा हिने मिसेस इंडियाचा बहुमान पटकाविला आहे. दि. इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या वतीने देशपातळीवर ही स्पर्धा आयोजित केली होती. शिल्पाच्या या यशाने चंद्रपूरचे नाव देशपातळीवर उंचावले असून, अमेरिकेत २०२२ मध्ये होणाऱ्या जागतिक मिसेस वर्ल्ड स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मिसेस इंडिया २०२१ या स्पर्धेत देशाभरातील ४७ स्पर्धकांची निवड करण्यात आली. शेवटच्या फेरीसाठी १५ स्पर्धक निवडले गेले. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत मुंबई येथील एका पंचतारांकित हॉटेल येथे अंतिम फेरी झाली. यात ५ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. इंट्रोडक्शन राऊंड, प्रेस कॉन्फरन्स, थीम राऊंड आणि सेलिब्रेटी राऊंड अशा चार प्रकारात स्पर्धा झाली. त्यात शिल्पा आडम या विजेत्या ठरल्या.
प्रसिद्ध सिनेतारका व मिस इंडिया सेलिना जेटली, डॉ. अदिती गोवित्रीकर, स्पीच एक्स्पर्ट सब्रीना मर्चंट, भारतीय हॉकीपटू युवराज वाल्मिकी, लेखक राधाकिशन पिल्ले यांनी परीक्षण केले. स्पर्धेचे आयोजन मालिका कलावंत सिद्धांत सूर्यवंशी यांनी केले होते.
देशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकविल्याबद्दल शिल्पाचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

माझी मुलगी शिल्पा हिने देशपातळीवरील मिसेस इंडियाचा सन्मान प्राप्त करणे ही चंद्रपुरातील चिंतलवार आणि सोलापुरातील आडम परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. आता शिल्पाने जागतिक पातळीवरील स्पर्धेतही यश संपादन करावे.
– अरुण चिंतलवार,
शिल्पाचे वडील (चंद्रपूर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here