लसीकरण आवश्यक अन्यथा RTPCR चाचणी अहवाल बंधनकारक

चंद्रपूर, ता. २३ : कोरोनाची लाट थोपवून धरण्यासाठी सध्यातरी कोरोना लस हा एकमात्र पर्याय आहे. लसीकरणामुळे कोरोनावर प्रतिबंध घालण्यात मोठे यश प्राप्त झाले आहे. तसेच भविष्यातील संभाव्य कोरोना लाट टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आता शहरात लसीकरण प्रमाणपत्र/आरटीपीसीआर चाचणी अहवाल तपासण्याची मोहीम मनपातर्फे राबविण्यात येणार आहे.

सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी तिसऱ्या लाटेचे भयावह परिणाम टाळण्यासाठी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. चंद्रपूर शहरात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान एकूण पात्र नागरिकांपैकी १ लाख ४९ हजार ६२५ जणांनी पहिली मात्रा घेतली. यातील ६९ हजार ९८ जणांची दुसरी मात्रा देखील पूर्ण झाली आहे. एकूण पात्र नागरिकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असल्याने लसीकरण मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. अनेक नागरिक लस घेण्यास देखील टाळाटाळ करत असल्याचे अहवाल आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले आहेत. सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिक, फेरीवाले, दुकानदार, व्यापारी, कामगार आदींनी लस घेतली नसल्यास मागील १५ दिवसांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक राहील. अन्यथा तत्काळ संबंधित व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या व योग्य कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व लवकरात लवकर लस घ्यावी तसेच आपल्या आप्त-परिचितांना देखील लसीकरणास प्रोत्साहित करावे, असे आवाहन मनपा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here