
मुंबई:काँग्रेसचे नेते तथा गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं होतं. काँग्रेसकडून मुकूल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा होती. त्यात रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
राजीव सातव यांचं कोरोना संसर्गाने निधन झालं. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असंही बोललं जात होतं. मात्र, अखेर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.