मनपा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

चंद्रपूर, ता. ८ : महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीत बुधवारी आयोजित रक्तदान शिबिरात अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह विविध विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असतांनाच डेंग्यु, मलेरीया या आजारांचे रुग्णसुध्दा सर्वत्र आढळून येत आहे. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने मनपा कार्यक्षेत्रात सप्टेंबर महिन्यात दर आठवड्यात एक असे एकूण ४ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत.

बुधवार, ता. ८ सप्टेंबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका कार्यालय मुख्य इमारत गांधी चौक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात मुख्य प्रशासकीय कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनीही रक्तदान करून सर्वानी रक्तदान करावे, असे आवाहन केले. यावेळी मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, शहर कार्यक्रम व्यवस्थापक नरेंद्र जनबंधू, डॉ. अतुल चटकी यांच्यासह मनपा आरोग्य विभागाची चमू आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. रक्तदात्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पुढील आठवड्यात १४ सप्टेंबर २०२१ सकाळी १० वाजता मनपा झोन कार्यालय क्र १ संजय गांधी मार्केट नागपूर रोड येथे, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी मनपा झोन कार्यालय क्र. २ सात मजली इमारत येथे, २८ सप्टेंबर २०२१ रोजी मनपा झोन कार्यालय क्र. ३ बंगाली कॅम्प मूल रोड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here