जिल्ह्यात “स्मार्ट शाळा” तयार करण्यासाठी 9 कोटी रुपये उपलब्ध करून देणार – पालकमंत्री वडेट्टीवार

शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार

चंद्रपूर दि. 5 सप्टेंबर : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधरविण्यासाठी सर्वांनी एकजुटिने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 65 ते 70 शाळांना भौतिक सुविधेसाठी पहिल्या टप्प्यात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच जंगल परिसरालगतच्या शाळांना वॉल कंपाउंडसाठी निधी उपलब्ध करून देणार असून स्मार्ट स्कूल तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव सादर केल्यास 9 कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, वित्त व बांधकाम सभापती राजू गायकवाड, समाज कल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती सुनील उरकुडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोशनी अन्वर खान, सर्व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, शिक्षणाधिकारी (माध्य)उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथ)दिपेन्द्र लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, आपल्या जीवनात शिक्षकाचे महत्व आहे, शिक्षक म्हटले की समाजाकडून अनेक अपेक्षा असतात. शिक्षक हा ग्रामीण भागातील आत्मा आहे. शिक्षक हा अतिसंवेदनशील असतो, जो समाजाप्रती जागरूक असतो तो शिक्षक असतो. जो समर्पित भावनेने कार्य करतो तो शिक्षक असतो, शिक्षक हा समाजशील असतो करुणादायी असतो म्हणून शिक्षकाची व्याप्ती ही फार मोठी असते. शिक्षकांमध्ये समाज घडविण्याची क्षमता आहे, यासाठी गोऱ्या कुंभाराची उपमा देता येईल. कठीण परिश्रम करून मेहनत करून विद्यार्थ्यांना घडवण्याची क्षमता, न बोलणाऱ्याला बोलतं करण्याची क्षमता ही शिक्षकांत आहे. आई वडीला नंतर दुसरे स्थान कोणाची असेल तर ते शिक्षकाचे आहे. एक डॉक्टर घडविण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात तसेच एक शिक्षक घडविण्यासाठी समर्पित भावनेने परिश्रम घ्यावे लागतात असेही ते म्हणाले.
शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील शिक्षकांसोबत संवाद साधला. कोरोना संकटात आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली. यासाठी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षकांमुळे डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
शिक्षक हा समाजाचा घटक म्हणून काम करतो, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य तसेच चांगला नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक करीत असतो, असे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले म्हणाल्या. त्यासोबतच विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देणे महत्त्वाचे आहे त्यामुळे बफर क्षेत्रात येणाऱ्या शाळांना डिजिटल व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 16 शिक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here