

दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत खासदार धानोरकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
चंद्रपूर : जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात बीएसएनएल मोबाइलची सेवा आणि सुविधा पोहचवावी तसेच पावसाळ्यात बीएसएनएलची दूरध्वनी व मोबाइल सेवा विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्या व शैक्षणिक सत्र, बहुतांश शासकीय कामे, नोकरीचे फार्म आदी कामे ऑनलाइन झाल्याने ग्रामीण भागात ब्रॉडब्रँड, थ्रीजी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, जिवती तालूक्यातील कुंभेझरी व कोडेपूर तसेच चिमूर तालुक्यातील साठगाव येथे टॉवर लावण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केला. दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक एस. के. शाहू, पंकज भुजबळ, दीपक कांबळे, विस्वास काळे, दिनेश जयस्वाल, राजेश शेंडे, सचिन सरोदे, मिलिंद नागराळे तसेच दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य भास्कर कावळे, ऍड. शाकीर बशीर मलक शेख, संदीप काळे, दीपक कत्रोजवार, प्रवीण महाजन बैठकीला उपस्थित होते.
यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बी. एस. एन. एल विभागाचा आढावा घेतला. त्यामध्ये अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, ब्रम्हपुरी, बल्लारपूर, राजुरा येथे वायफाय शहर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच निधी प्राप्त होऊन या शहरामध्ये हि सेवा सुरु होणार आहे. त्यासोबतच बी. एस. एन. एल आधी घराघरात प्रत्येकाकडे वापरले जात होते. मात्र आता कालांतराने वापर कमी होत आहे. भविष्यात इतिहास जमा न होता येत्या काळात बी. एस. एन. एल चे जुने दिवस परत आणण्याकरिता काम करा, अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असते यामध्ये तारा तुटल्यास अनेक दिवस सेवा खंडित होत असतात. त्यामुळे तारा दर्शविणारे फलक लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खासगी दूरसंचार कंपनीला स्पर्धक ठरण्यासाठी बी. एस. एन. एल अद्याप २ जी व ३ जी सर्विस देत आहे. दुसरीकडे खाजगी कंपनी ४ जी व ५ जी कडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला बी. एस. एन. एल कमी पडताना दिसत आहे. परंतु हे चित्र फार फाईट असून येत्या काळात हे चित्र बदलविण्याकरीता बी. एस. एन. एल मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोकरी म्हणून काम न करता जणसेवा म्हणून काम केल्यास निश्चित चित्र बदलणार अशी अशा खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली.