
चंद्रपूर: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते गणपतराव देशमुख आबा यांचे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 96 वर्ष होते. पोटाच्या एका ऑपरेशन निमित्त त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती मात्र शेवटी काळाने घाला घातला आणि काळाने त्यांना हिरावून घेतले.
राजकारणातील भीष्म पितामह हरपला – आ. किशोर जोरगेवार
11 वेळा निवडुन येत तब्बल 54 वर्ष सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभेच नेतृत्व करणारे ऍड. डॉ. भाई गणपतराव देशमुख राजकारणातील व्यासपीठ होते. आज त्यांच्या जाण्याने राजकारणातील भीष्म पितामह हरपला असल्याचे शोकसंदेशात चंद्रपुर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
वृद्धपकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कामाच्या पद्धती विषयी अनेकदा ऐकले मात्र त्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली नाही याची खंत आहे. शेतकरी आणि कामगार या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केलं. या क्षेत्राचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. अत्यंत साधे व सुसंस्कृतपणामुळे ते सर्वांना आपलेसे वाटायचे. विधानसभेतील त्यांच्या प्रदीर्घकाळीन अनुभवामुळे ते अनेकांचे मार्गदर्शन होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवे नेतृत्वही उदयास आले. ते एक तत्वनिष्ठ व आदर्श राजकारणी होते. मात्र आज त्यांच्या जाण्याने अनुभावाची एक जिवंत पुस्तिका कायमची बंद झाली असल्याचे आ. किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.