अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी-आ. मुनगंटीवार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्‍हयात दोन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्‍याने शेतक-यांच्‍या शेतपिकाचे, नागरिकांच्‍या घरांचे, दुकानांचे, अन्‍नधान्‍य आदिंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन आपदग्रस्‍तांना तातडीने नुकसान भरपाई देण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्‍हयात दोन दिवस झालेल्‍या मुसळधार पावसाने शेकडो घरांची पडझड झाली. तर हजारो हेक्‍टरवरील पीके पुराच्‍या पाण्‍याखाली आली. पंधरा पैकी ९ तालुक्‍यांमध्‍ये अतिवृष्‍टी झाली असुन जिल्‍हयत एकुण ९०४० मीमी पावसाची नोंद झाली आहे. बल्‍लारपूर शहरात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून भिंत कोसळून एका महिलेचा मृत्‍यु झाला. ऐतिहासिक किल्‍याचा काही भाग खचला, विसापुर गावात भिंत कोसळून एक महिला जखमी झाली. राजुरा तालुक्‍यात अनेक मार्ग पुरामुळे बंद झाले. मोठया प्रमाणावर घरांची पडझड झाली. जिवती तालुक्‍यात अनेक गावांमध्‍ये सोयाबिन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तेलंगाणातील पुराचा महाराष्‍ट्रातील पिकांना फटका बसला. ब्रम्‍हपुरी तालुक्‍यातील सुध्‍दा गोसीखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडल्‍याने शेतीला फटका बसला आहे. मुल तालुक्‍यात अनेक घरांची पडझड व शेतीचे नुकसान झाले आहे. कोरपना तालुक्‍यात कपाशीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अमलनाला धरण १०० टक्‍के भरल्‍याने वर्धा नदीला आलेल्‍या पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले.
जिल्‍हयात दोन दिवस झालेल्‍या मुसळधार पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्‍य जनतेला मोठया प्रमाणावर फटका बसला असुन जिल्‍हा प्रशासनाने तातडीने झालेल्‍या नुकसानाचे पंचनामे करावे आणि नुकसान ग्रस्‍तांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. जिल्‍हयातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी या प्रक्रियेत नुकसान ग्रस्‍तांच्‍या अडचणी जाणून घेत त्‍यांना नुकसान भरपाई मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने सहकार्य करावे असे आवाहनही देखिल आ. मुनगंटीवार यांनी  केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here