ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करावे

आ. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्‍याकडे मागणी

चंद्रपूर: औद्योगिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्‍या बल्‍लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची तातडीने दुरूस्‍ती करत सौंदर्यीकरण करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भारत सरकारचे पर्यटन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांना पत्र पाठविले आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे बल्‍लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याचे दोन प्रमुख बुरूज ढासळले असून किल्‍ल्‍याच्‍या संरक्षक भिंतींना मोठमोठया भेगा पडलेल्‍या असून तडे गेलेले आहेत. हा किल्‍ला बल्‍लारपूर शहराचे ऐतिहासिक वैभव आहे. या गोंडकालीन किल्‍ल्‍याच्‍या उत्‍तर-पूर्व दिशेला असलेला बुरूज तसेच पुरातन गोविंदबाबा मंदीरानजिकचा बुरूज पूर्णपणे ढासळला आहे. त्‍यामुळे बल्‍लारपूर शहराच्‍या या प्राचीन व ऐतिहासिक वैभवाचे तातडीने जतन व संवर्धन होणे आवश्‍यक आहे.
बल्‍लारपूरातील हा किल्‍ला १३२० मध्‍ये आदिया बल्‍लारशाह या राजाने बांधला. बल्‍लारपूरातील अंतिम राजा खांडक्‍या बल्‍लारशाह यांनी या किल्‍ल्‍याच्‍या परकोटयाची पायाभरणी केली. गोंडकालीन वैभव असलेल्‍या या किल्‍ल्‍याची तातडीने दुरूस्‍ती करून किल्‍ल्‍याचे नव्‍याने सौंदर्यीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने भारत सरकारने निधी उपलब्‍ध करावा अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केली आहे. या माध्‍यमातुन या प्राचीन व ऐतिहासिक वास्‍तुचे संवर्धन तर होईलच तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्‍या या किल्‍ल्‍याच्‍या सौंदर्यात भर घातली जाईल असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here