ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्‍पात बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरांचा समावेश त्वरीत करणार

ना. नितीन गडकरी यांचे आमदार मुनगंटीवार यांना आश्वासन

चंद्रपूर: केंद्रीय भूपृष्‍ठ परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातुन ड्रीम प्रोजेक्‍ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्‍तावित करण्‍यात आला आहे. या प्रकल्‍पात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा प्रामुख्‍याने समावेश करण्‍यात आला आहे. परंतु औद्योगिकदृष्‍टया महत्‍वाच्‍या असलेल्‍या बल्‍लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश या प्रकल्‍पात करण्‍यात आलेला नाही. ना. नितीन गडकरी यांनी या विभागावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्‍ध करून दिला आहे. या प्रकल्‍पात त्‍यांनी बल्‍लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश करावा अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ना. नितीन गडकरी यांच्‍याकडे केली आहे. बल्‍लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश या प्रस्‍तावित प्रकल्‍पामध्‍ये त्‍वरीत करण्‍याचे आश्‍वासन ना. गडकरी यांनी यावेळी दिले.

दिनांक १५ जुलै रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेत त्‍यांना निवेदन सादर केले व चर्चा केली. ब्रॉडगेज मेट्रो या प्रकल्‍पात बल्‍लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश करण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी यावेळी प्रतिपादीत केली. बल्‍लारपूर हे महाराष्‍ट्रातील प्रमुख रेल्‍वे जंक्‍शन आहे. भारताच्‍या विभीन्‍न भागातून महत्‍वपूर्ण रेल्‍वे बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्‍लारपूर आणि चंद्रपूर येथील दोन्‍ही रेल्‍वे स्‍थानके रेल्‍वे विभागाच्‍या सर्वोत्‍तम रेल्‍वे स्‍थानकांच्‍या स्‍पर्धेत देशात अव्‍वल ठरली आहेत. या दोन्‍ही शहरांचा समावेश या प्रकल्‍पात झाल्‍यास या परिसराच्‍या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमीका आ. मुनगंटीवार यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. सदर प्रस्‍तावित प्रकल्‍पात बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरांचा समावेश करण्‍यात येईल असे आश्‍वासन ना. नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. यावेळी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चंद्रपूर चे पदाधिकारी रामजीवन परमार ,दिनेश नथवाणी, दिनेश बजाज, अनिल टहलीयानी, सुमेध कोतपल्लीवार यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here