पोलिसांच्‍या मारहाणीमुळे मृत झालेल्‍या अनिल मडावी यांच्‍या मृत्‍युची सखोल चौकशी करावी

आ. सुधीर मुनगंटीवार यांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी

चंद्रपूर:जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यातील विरूर स्‍टेशन येथील अनिल गणपत मडावी यांचा पोलिस कस्‍टडीत असताना पोलिसांच्‍या मारहारणीमुळे मृत्‍यु झाल्‍याच्‍या प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या मागणीसाठी दिनांक १४ जुलै रोजी पोलिस अधिक्षक श्री. साळवे यांची भेट घेत त्‍यांनी शिष्‍टमंडळासह निवेदन सादर केले. यादरम्यान आ. मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली . गृहमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन आ.मुनगंटीवार यांना दिले .

यावेळी पोलिस अधिक्षकांशी झालेल्‍या चर्चेत आ. मुनगंटीवार म्‍हणाले, अनिल मडावी यांच्‍या आई श्रीमती विमल मडावी यांनी यासंदर्भात आपणाकडे तक्रार केलेली आहे. मृतक अनिल मडावी यांचे पार्थीव अजूनही जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयातील शवगृहात ठेवलेले आहे. हा मृत्‍यु पोलिस कस्‍टडीत असताना पोलिसांच्‍या मारहाणीमुळे झाल्‍याचा आरोप श्रीमती विमल मडावी यांनी केलेला आहे. सदर प्रकरणाची एकूणच सखोल चौकशी करून मडावी कुटूंबियांना न्‍याय मिळण्‍याची आवश्‍यकता आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्‍याचे आश्‍वासन पोलिस अधिक्षक श्री. साळवे यांनी दिले.

या शिष्‍टमंडळात चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्‍यक्ष रामपाल सिंह, मनपा स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, महानगर अनुसूचित जमाती अध्‍यक्ष घनराज कोवे, वाघूजी गेडाम आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here