‘आपले शहर- कोरोनामुक्त शहर’ उपक्रमाला सुरुवात

नागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी

चंद्रपूर:जन विकास सेनेतर्फे चंद्रपूर मध्ये ‘आपले शहर-कोरोनामुक्त शहर’ या उपक्रमाला १७ जून रोजी दुपारी १२ वाजता च्या दरम्यान सुरुवात करण्यात आलेली आहे.विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये मास्क लावण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जनविकास चे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात भुषण फुसे, इमदाद शेख, मनीषा बोबडे, कांचन चिंचेकर, अक्षय येरगुडे, राहुल दडमल, गितेश शेंडे, निलेश पाझारे, कार्तिक दुरटकर, रवि काळे, स्वप्नील शेंडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी गांधी चौकातील गोल बाजारामध्ये बिगर मास्क ने फिरणाऱ्या लोकांना गुलाब पुष्प तसेच नवीन मास्क देऊन गांधीगिरी केली.गोल बाजारातील काही दुकानदार व दुकानात काम करणार्‍यांना सुद्धा गुलाब पुष्प व नवीन मास्क देण्यात आले.नागरिकांनी सुद्धा गुलाब पुष्पाचा स्वीकार करून व तात्काळ नविन मास्क चेहऱ्यावर लावून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेत शहरातील अनेक नागरिकांचे नाहक बळी गेले, अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.मात्र तरीही संचारबंदी हटल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. विशेष करून मास्क लावण्या बाबत अजूनही काही नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव दिसतो. भविष्यात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क लावणे, अंतर नियमाचे पालन करणे, हात वारंवार धुणे किंवा सॅनेटाईझ करणे तसेच लस घेऊन स्वतःला सुरक्षित करणे हेच सर्वात उत्तम उपाय आहेत. शहरातील नागरिकांचे भविष्यात कोरोना विषाणू पासून संरक्षण करण्याच्या हेतूने जनविकास सेनेतर्फे ‘आपले शहर- कोरोनामुक्त शहर’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे.या अंतर्गत कोरोनाच्या नियमांचे बद्दल जागरुकता निर्माण करणे,लसीकरणा साठी नागरिकांना सहकार्य करणे तसेच कोरोना चाचणी बद्दल आवश्यक माहिती देणे,लाॅकडाऊनमध्ये घरातल्या घरात राहणाऱ्या लहान मुलांच्या मानसिक-शारीरीक आरोग्याबद्दल प्रबोधन करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
गोल बाजारा प्रमाणे चंद्रपूर शहरातील गंजवार्ड,बंगाली कॅम्प चौक, दाताळा रोड वरील भाजी मार्केट,एसटी वर्कशॉप चौक,जनता कॉलेज चौक, भिवापुर सुपर मार्केट व बागला चौक, जटपुरा गेट इत्यादी गर्दीच्या ठिकाणी ‘आपले शहर-कोरोनामुक्त शहर’ उपक्रमा अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये बिगर मास्क ने फिरणाऱ्या लोकांना गुलाब पुष्प देऊन मास्क वाटप करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here