“महाआवास अभियान-ग्रामीण” अंतर्गत लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी सुपूर्द

चंद्रपूर दि. 15 जून : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अमंलबजावणी गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर ते 5 जून 2021 या कालावधीत ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यात आले.
अभियानअंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात घरकुलाची चावी सुपुर्द करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे विस्तार अधिकारी प्रिती वेल्हेकर, सहायक प्रकल्प अधिकारी प्रणव बक्शी, जिल्हा प्रोग्रामर दिपाली जवळे प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना हक्काचे घर मिळावे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा तसेच त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी महत्वपूर्ण असा उपक्रम राज्यात राबविला जात आहे. सदर कार्यक्रमादरम्यान अभियान कालावधीत पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या हस्ते घरकुलाची चावी सुपूर्द करण्यात आली.
यामध्ये रमाई आवास योजनेचे लाभार्थी स्वप्निल दुपारे, रा.विचोडा, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रेखा मोहुर्ले रा.वरवट तर शबरी आवास योजनेचे लाभार्थी मोरेश्वर पेंदोर,रा.लोहारा या लाभार्थ्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here