पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्याला 7 व्हेंटिलेटरची मदत 

चंद्रपूर,दि.14 जून: कोरोना काळामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अभावी कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यासाठी 7  व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 7 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.  त्यापैकी चंद्रपूर येथे 4 तर वरोरा येथील 3 व्हेंटिलेटरचा समावेश आहे. सदर व्हेंटिलेटरचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडले.
सदर लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच संदीप गिऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यासोबतच  उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे 3 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यातील रुग्णांना व्हेंटिलेटर बेडसाठी शहराचा रस्ता धरावा लागणार नाही. तालुक्यातच आता रुग्णांना मोफत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊन उपचार होणार आहेत. वरोरा,उपजिल्हा रुग्णालयात या व्हेंटिलेटरचा निश्चितच उपयोग होईल. तसेच दिलेल्या व्हेंटिलेटरचा योग्य वापर करावा असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिलेत.  रुग्णांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सेवा व उपचार मिळावे, या दृष्टिकोनातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने जिल्ह्यासाठी एकूण 7 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या आधुनिक व्हेंटिलेटरचा मोठा फायदा  रुग्णालयातील रुग्णांना होणार आहे.
वरोरा येथील लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे, गट विकास अधिकारी श्री.वानखेडे, नितीन मते, मुकेश जिवतोडे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here