टोकाची भूमिका घेण्याचा डेरा आंदोलनातील संतप्त महिला कामगारांचा इशारा

कामगारांमध्ये पुन्हा एकदा उद्रेक, सामान्य रुग्णालया समोर निदर्शने व घोषणाबाजी

चंद्रपूर:थकित पगाराच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 च्या जवळपास कोरोना योध्द्या कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला जवळपास 4 महिने पूर्ण होत आले. आंदोलनकर्त्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यात शासनाला अपयश आलेले आहे. मात्र थकीत पगाराची मागणी करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा रोजगार हिरावून घेण्याचे कट-कारस्थान आता वैद्यकीय शिक्षण विभागाचे भ्रष्ट अधिकारी करीत असल्याचा आरोप कामगारांनी केलेला आहे. शासनाची पूर्वपरवानगी घेऊन 562 कंत्राटी पदांसाठी मे 2020 मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.मात्र तब्बल एक वर्षानंतर केवळ 207 पदांना मंजुरी देऊन कंत्राटदाराला कामाचा आदेश देण्यात आला. 207 कामगारांच्या नावाची यादी लावून वैद्यकीय शिक्षण विभागाचे भ्रष्ट अधिकारी कामगारांमध्ये फूट पाडण्याचा, डेरा आंदोलन संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत,असा आरोप करीत कामगारांनी आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान सामान्य रुग्णालया समोर एकत्रित येऊन घोषणाबाजी केली. तसेच कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास टोकाची भूमिका घेण्याचा इशारा सुद्धा काही महिला कामगारांनी यावेळी दिला.कामगारांचे जीवाचे बरे वाईट झाल्यास वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकारी जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया यावेळी महिला कामगारांनी व्यक्त केली.

शासन भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कामगारांच्या जीवाशी खेळत आहे… पप्पू देशमुख

वैद्यकीय महाविद्यालय व 500 बेडच्या रुग्णालयासाठी 2017 च्या शासन निर्णयानुसार 562 पदे मंजूर आहेत. शासनाची पूर्वपरवानगी घेऊन अधिष्ठाता कार्यालयाने मे 2020 मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती.परंतु कंत्राटदाराची वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत ‘अर्थपूर्ण’ सेटिंग होऊ शकली नाही.त्यामुळे 12 महिने पर्यंत कंत्राटदाराचा कार्यादेश रोखून ठेवण्यात आला. कंत्राटदार नसल्यामुळे कोणाच्या मार्फत पगार द्यायचा हा प्रश्न उपस्थित झाल्याने थकीत पगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,संचालक डॉ. तात्याराव लहाने व तत्कालीन अधिष्ठाता डाॅ.एस.एस.मोरे यासाठी जबाबदार आहेत. थकित पगारामुळे 3 कामगारांचे जीव गेले, तीन मुले अनाथ झाली. अनेक कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांचे उपचारा अभावी अकाली निधन झाले. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला पाहिजे.परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी शासन कोरोना योध्द्या कामगारांना त्यांच्या हक्काचा थकीत पगार देण्यास विलंब लावत आहे असा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केलेला आहे. शासन निर्णयाप्रमाणे मंजूर 562 पदासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी कोणत्या अधिकाराने 355 पदे नामंजूर केली हे जाहीर करावे असे आव्हान सुध्दा देशमुख यांनी शासनाला दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here