
मुंबई: संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊनसारखी कठोर निर्बंध लागू केले आहे. मात्र लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक लागला आहे. रिकव्हरी रेट वाढला आहे. तरी राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन सरसकट उठवता येणार नसल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार असून काही नियम शिथिल करण्यात येणार आहे. लॉकडाऊन बाबतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती देखील आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात मुंबईसह काही मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्येत घट दिसत असली तरी 21 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रेट जास्त आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यातील लॉकडाऊन सरसकट उठण्यात येणार नाही. तर काही ठिकाणी नियमांमध्ये शिथिलता देण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.