
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीच्या कोरोना उपचार केंद्राचे उद्घाटन
चंद्रपूर:मानव सेवा हेच सर्वात उत्तम कार्य होय. आपले व्यावसायिक व कौटुंबिक कर्तव्य पार पाडताना प्रत्येकाने सेवा कार्य करणे गरजेचे आहे. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीने सुरू केलेले कोरोना उपचार केंद्र व विलगीकरण केंद्र हा एक चांगला उपक्रम असून, या कार्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन प्रतिथयश उद्योजक किसनचंद चढ्ढा यांनी केले.
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूरच्यावतीने येथील दूध डेअरी परिसरातील आश्रय प्रकल्पात कोरोना उपचार केंद्र व शुल्क तत्वावर विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा उदघाटन सोहळा बुधवार, 19 मे रोजी पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष वसंत थोटे होते. तर, सचिव आशिष धर्मपुरीवार उपस्थित होते.
थोटे यांनी, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच संघाचा सेवा विभाग रुग्णांसाठी निरंतर सेवा कार्य करीत आहे. समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, वनवासी भागातील नागरिकांना औषधी उपलब्ध करून देणे आदी सेवा कार्य करण्यात येत आहे. कोरोना संकट काळात आरोग्य सेवा कमी पडत असल्याने शासनाला मदत व्हावी, यासाठी कोरोना उपचार केंद्र व 18 खाटांचे विलगीकरण केंद्र समितीच्या वतीने सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. तसेच रुग्ण घरी गेल्यानंतर त्यांना वाफ घेण्यासाठीचे साहित्य, प्राणवायू व ताप मोजण्याचे यंत्र देण्यात येणार आहे, असेही सांगितले.ऍड आशिष धर्मपुरीवार यांनी प्रास्ताविक व परिचय केले. तर आभार प्रदर्शन समितीचे कोषाध्यक्ष संदीप बच्चुवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने झाली. या कार्यक्रमाला कोविड केयर सेंटर प्रमुख गोविंद तेला, कपिश उजगावकर, सुरज पेदुलवार, विदर्भ धर्मजागरण प्रमुख महेंद्र राईचुरा, जिल्हा कार्यवाह शैलेश पर्वते, दामोदर सारडा, डॉ. अनुप पालीवाल, अभय पाचपोर, मुकुंद पाठक उपस्थित होते.