

चंद्रपूर: खरीप हंगामाची तयारी सुरू असताना केंद्राने खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार असून गेले वर्षभर कोरोना संकटामुळे लॉकडाऊन चा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना वेठीस धरणारी ही भाववाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे केली आहे.
एकीकडे शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने वार्षिक सहा हजारांची घोषणा करायची दुसरीकडे खतांच्या किमती भरमसाठ वाढवून बळीराजा कडून दामदुप्पट वसूल करून त्यांचा गळा घोटायचा असे दुटप्पी धोरण केंद्र सरकार करीत आहे.
खतांमध्ये केलेली दरवाढ ही एकप्रकारे शेतकऱ्यांची लूट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या प्रकरणी तात्काळ निर्णय घेऊन दरवाढ मागे घ्यावी अशी आग्रही मागणी खा. बाळू धानोरकर यांनी केली आहे.