

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते,खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र काही दिवसांपूर्वीच सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आता त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांची तब्बेत खालावली होती.
राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता, त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले होते. या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झाली होती, त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. मात्र अखेर राजीव सातव हे कोरोना विरुद्ध लढाई हरले.