‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट’ पोर्टलवर नोंदणीसाठी आधारलिंक मोबाईल व ओटीपीची गरज नाही

चंद्रपूर दि.13 मे, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता गंभिर रूग्णांना बेडच्या शोधात विविध रूग्णालय फिरावे लागू नये, त्यांना ऑक्सीजन, आय.सी.यु. किंवा व्हेंटीलेटरचे बेड मिळून रूग्णांची यथायोग्य सोय व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेवून ‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट’ पोर्टल कार्यान्वित केले आहे.
कोविड रूग्णांना बेड उपलब्धतेची माहिती मोबाइलवर देण्यात येणार असल्याने या पोर्टलवर नोंदणी करताना अधिकतम चार रुग्णांच्या नोंदणीसाठी कोणत्याही एका मोबाइल क्रमांकाचा वापर करता येऊ शकेल, जेणेकरून मोबाईल नसलेल्या रूग्णालाही नोंदणीसाठी अडचण येणार नाही. याबाबतची माहिती प्रशासनाद्वारे वृत्तपत्र व इतर माध्यमांतून यापुर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोर्टलवर नोंदणी करतांना मोबाईल क्रमांक केवळ अनुषंगीक संपर्कासाठी आवश्यक करण्यात आला असून आधार क्रमांक युनिक आयडी असल्याने रूग्णाची ओळख पटविण्यासाठी नोंदवायचा आहे, त्यामुळे पोर्टलवर नोंदणीसाठी आधार लिंक असलेल्या मोबाईलची काहीही गरज नाही. तसेच बेड उपलब्धतेसाठी कोणत्याही ओटीपी ची गरज पडत नाही. यासबंधाने माध्यमात चुकीचे व अफवा पसरवणारे वृत्त प्रकाशीत झाले असल्यास नागरिकांनी त्यावर विश्वासू ठेवू नये, असा खुलासा जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
याशिवाय बाहेर जिल्ह्यातील रूग्ण उपचार घेण्यास आला असता त्यांना देखील पोर्टलचा लाभ घेवून नोंदणी करता येईल तसेच कोणताही अतिगंभीर रूग्ण उपचारासाठी तात्काळत राहू नये यासाठी गंभीर रूग्णांना अगोदर रूग्णालयात दाखल करून घेण्याचे व त्यानंतर त्यांची पोर्टलवर नोंदणी करण्याचे निर्देश प्रशासनाने यापुर्वीच सर्व कोविड रूग्णालयांना दिले असल्याचे जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here