

मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांची मुदत १ जून पर्यंत वाढविण्याचा आदेश शासनाने जाहीर केला आहे. सध्या लागू असलेले निर्बंध या नव्या आदेशानुसार कायम राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आता कोरोनाचा निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा राहणार आहे.
राज्यातले कडक निर्बंध ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १ जून पर्यंत वाढविण्याचे सुतोवाच आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी काल मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केले होते. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी आज याबाबतचा आदेश जारी केला आहे.
असे आहेत नवे निर्बंध:
– १ जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत निर्बंध लागू
– देशाच्या कुठल्याही भागातून महाराष्ट्रात कुठल्याही वाहनाने येणाऱ्या व्यक्तीला प्रवासाच्या ४८ तास आधी केलेला आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल बाळगावा लागणार
– माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये ड्रायव्हरबरोबर फक्त क्लिनरला मुभा
-अन्य निर्बंधांबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार
• एपीएमसी, बाजारपेठांसाठी निर्बंध लागू करण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश
– शिस्तपालन न झाल्यास बाजारपेठा बंद करण्याचेही स्थानिक प्रशासनाला अधिकार
– दूध संकलन वितरण यावर बंधने नाहीत. मात्र, कोरोना नियमांचे पालन करावे लागणार
– विमानतळ व बंदरे यांच्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो व मेट्रो प्रवासाची परवानगी.