चंद्रपूर जिल्ह्यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन तपासणी मोहीम

चंद्रपूर, दि.11 मे: कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये तसेच संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून रस्त्यावरच अँटीजेन तपासणी करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र तरीही काही नागरिक याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू केली आहे.तपासणीअंती विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे.सद्यस्थितीत चंद्रपूर ग्रामीण क्षेत्र, बल्लारपूर, राजुरा आणि चिमूर या तालुक्याच्या ठिकाणी ही कारवाई केली जात आहे.

घुगुस येथील विनाकारण फिरणाऱ्या 57 नागरिकांची अॅटींजेन तपासणी करण्यात आली तर पडोली येथे 67 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून कोणत्याही व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आढळून आलेला नाही.

बल्लारपूर शहरातील मुख्य चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीचे अॅटींजेन तपासणी करण्यात येत आहे.
शहरात ही मोहीम तीन ठिकाणी राबविण्यात येत आहे.
बल्लारपूर शहरात सकाळी 11 वाजेपासून 88व्यक्तींची अॅटींजेन तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे.

राजुरा शहरात पंचायत समिती चौकामध्ये नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आज जवळपास 28 नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून एकाही व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आढळून आलेला नाही.

चिमूर शहरात बाजारपेठेलगत मुख्य रस्त्यावर 50 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

जो कोणी व्यक्ती कोरोना संशयित आढळल्यास त्याची तिथेच अॅटींजेन तपासणी केली जात आहे. त्यामुळे लक्षण नसलेले रुग्ण शोधण्यास मदत मिळत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून इतर लोकांना होणारी बाधा टाळू शकतो. पोलीस, आरोग्य विभाग व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here