बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवाना धारकांकडूनच करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.9 मे: कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी या शेत पिकाकडे वळतात. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याचाच फायदा घेत काही बियाणे कंपन्या बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक लूट करीत असतात. नुकतेच कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकत 70 लाखांचे बोगस बियाणे जप्त केले.
एचटीबीटी कॉटन बियाण्यांचा निषेध म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या नेतृत्वात कार्यालय परिसरात अनाधिकृत एचटीबिटी बियाणे पाकिटांची शेतकऱ्यांमार्फत होळी करण्यात आली.

यावेळी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक पी.आर.मडावी, कृषी सहाय्यक अनिल भोई, श्री. ढाकणे व शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत कृषी निविष्ठा केंद्र, कृषी केंद्र धारकाकडूनच मान्यताप्राप्त बियाणे अधिकृत पावतीसह खरेदी करावेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून प्रतिबंधित कापूस बियाणे खरेदी करू नये तसेच एखादी व्यक्ती अनाधिकृत कृषि निविष्ठा विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तथा पोलीस विभागास कळवावे असे आवाहन केले.

उपस्थित शेतकऱ्यांनी अनधिकृत कापूस बियाण्यांच्या पाकिटाची होळी करून निषेध व्यक्त केला. व यापुढे अशा प्रकारची अनाधिकृत व बोगस बियाण्यांचा वापर करणार नाही व इतर शेतकऱ्यांनी सुद्धा या बियाण्यांचा वापर करू नये. बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी असा संदेश आपल्या शेतकरी बांधवांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here