

-जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांचे विरूध्द सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला पाहीजे
-नगरसेवक पप्पू देशमुख यांची मागणी
चंद्रपूर :एका रुग्णाला अवाजवी देयके आकारल्यामुळे चंद्रपुरातील डॉ. रितेश दीक्षित यांच्या श्वेता हॉस्पिटल ला टाळे लावण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमध्ये रुग्णांची लूट करणाऱे डॉक्टर व त्यांच्या दवाखान्या विरूध्द कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.राज्यातील अनेक इस्पितळांनी रूग्णांकडून अतिरिक्त पैसे
उकडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.अशा सर्व प्रकरणांमध्ये संबंधित इस्पितळाच्या मालकांना अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत करण्यास प्रशासनाने भाग पाडले व सर्व रुग्णांच्या देयकांची तपासणी करणारी यंत्रणा निर्माण केलेली आहे. परंतु कारवाई करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार न करता थेट व्हेंटीलेटर युक्त दवाखानाच बंद करण्याची अघोरी कारवाई चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केलेली आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी या अधिकाऱ्यांनी नैराश्यातून अशी अघोरी कारवाई केल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये विजेच्या एका खांबासाठी ऑक्सीजन प्लांट सुरू होण्यास चार महिने विलंब झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अरूण हुमणे तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यासाठी जबाबदार आहेत.ऑक्सीजन प्लांट नियोजीत वेळेवर सुरू झाला असता तर अनेक रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य झाले असते. कोविड रूग्णालयाला परवानगी देण्याचे मनपा आयुक्तांना पूर्ण अधिकार आहेत.मात्र जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवून अनेक रुग्णालयांना परवानगी देण्यास विलंब करण्यात आला. चंद्रपूर शहरात दोनच सिटीस्कॅन मशिन असल्यामुळे सिटीस्कॅन करण्यासाठी मोठी गर्दी होत असतानाही नियमांची पूर्तता करणाऱ्या डॉ विवेक रामटेके यांच्या नवीन सिटीस्कॅन सेंटरला मंजुरी देताना टाळाटाळ करण्यात आली.22 एप्रिल ला त्यांनी टाकलेल्या अर्जावर दहा दिवसापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते व वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ अरुण हुमने यांनी कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून ‘ॲक्शन मोड’मध्ये काम करण्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी जिल्ह्यातील अनेक रुग्णांना नाहक जीव गमवावा लागला. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त ‘रिॲक्शन मोड’ मध्ये आक्रमकतेने काम करीत आहेत ही चांगली बाब आहे.परंतु रुग्णांना उपचाराच्या सुविधा मिळवून देण्यासाठी ‘ॲक्शन मोड’ मध्ये हे अधिकारी काम का करीत नाहीत ? हा गंभीर प्रश्न आहे.
जिल्ह्यामध्ये आजच्या तारखेला केवळ 89 व्हेंटिलेटरयुक्त बेड आहेत. व्हेंटिलेटर साठी रुग्णाचे नातेवाईक जिवाच्या आकांताने वणवण फिरत आहेत. राज्याबाहेर करीमनगर, मंचेरियल येथे जाऊन लाखो रुपये खर्च करून आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहेत. ऑक्सीजन बेड व वेंटीलेटर अभावी आजपर्यंत जिल्ह्यातील शेकडो रुग्ण प्राणाला मुकले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर उपलब्ध असलेला एक दवाखाना बंद करून टाकणे ही अघोरी कारवाई आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना भविष्यातही नाहक प्राण गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे थेट जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही नगरसेवक देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे.
श्वेता हाॅस्पीटल मध्ये पूर्णवेळ मनपाचे दोन ऑडिटर बसविणे, श्वेता हॉस्पिटल ला मोठा आर्थिक दंड ठोठावणे किंवा श्र्वेता हाॅस्पीटल ताब्यात घेऊन चालवणे या पर्यायांचा जिल्हा व मनपा प्रशासनाने विचार करावा अशी जनविकास सेनेची मागणी आहे. आजपर्यंत उपचार घेतलेल्या रुग्णांना आकारलेल्या देयकांची तपासणी करून अतिरिक्त देय वसुली झालेली असल्यास रुग्णांच्या खात्यामध्ये जमा करायला भाग पाडण्याची कारवाई सुद्धा दवाखान्याच्या व्यवस्थापन विरुद्ध करणे शक्य आहे मात्र या सर्व पर्यायांचा विचार न करता थेट व्हेंटिलेटर युक्त दवाखाना बंद केल्यास भविष्यात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात येईल असा इशारा सुद्धा देशमुख यांनी दिला.