
आदरणीय कै. डॉ. अंजनी मोकदम…या माझी आई प्रमिला, हिची सख्खी आत्या, या नात्याने त्या माझ्या ‘आजी’ होत्या. घरातील सर्व त्यांना ‘बाई’ म्हणून आदराने संबोधित असे. म्हणून माझ्यासह इतर सर्वच नातवंडांच्या त्या ‘बाई आजी’ होत्या.
माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा कै. जागेश्वर मोकदम यांचे लहान बंधू डॅा दिवाकर यांना सगळे ‘भाऊ’ म्हणत आणि भाऊंपेक्षा लहान बहीण ‘अंजनी ‘, असे हे तिघे भाऊ-बहीण. ‘भाऊ’ हे surgeon आणि ‘अंजनी’ या gynaecologist झाल्यात.
१९०५ पासून, म्हणजेच सव्वाशे वर्षांपासून मोकदम घराण्यात allopathy practice ची परंपरा सुरू आहे.
माझे पणजोबा कै. गणपतराव मोकदम १९०५ मध्ये पाटण्याच्या टेंपल मेडीकल स्कूलमधून LMP झालेत व ते anatomy & surgery मध्ये gold medalist होते.
डॉ. अंजनी मोकदम, या त्यांच्या कन्येने, मुंबई च्या KEM येथून MBBS शिक्षण घेतले आणि त्या पश्चात सन १९४४ मध्ये मुंबई च्या KEM येथूनच त्या MD (obs & gyn) झाल्यात.
त्या सोबत मुंबईच्या कॅालेज ॲाफ फिजीशीयन्स ॲंड सर्जन्सची गायनॅकॅालॅाजीची फेलोशिप त्यांनी प्राप्त केली.
उच्च शिक्षणासाठी दोन वर्षे त्यांचे वास्तव्य एडिंबरला होते. परंतु त्यांचे ज्येष्ठ बंधू डॅा दिवाकर (भाऊ), यांना आलेल्या जबरदस्त हार्ट अटॅकमुळे त्यांना १९५८ मध्ये परत यावे लागले, आणि नागपूरच्या डागा हॅास्पीटलच्या सुपरिटेंडटचा पदभार स्विकारावा लागला. त्याशिवाय रामदासपेठ येथे ‘मोकदम क्लिनीक’ मध्ये स्वत:ची प्रॅक्टिस त्यांनी सुरु केली. १९६० मध्ये भाऊंच्या अकाली मृत्युनंतर मोकदम क्लिनिकची धुरा त्यांना सांभाळावी लागली.
तसेच, त्यांचे ज्येष्ठ surgeon बंधू, डॉ. दिवाकर (भाऊ)मोकदम, यांच्या अकाली निधनानंतर, त्या स्वतःहुन अविवाहित राहिल्या आणि भावाच्या कुटुंबाचा आधार स्तंभ बनल्या.
नागपूर येथील रामदासपेठ येथे ‘मोकदम क्लिनिक’ या नावाने त्यांचे खासगी मॅटर्निटी होम होते. आमच्या घराण्यातील सर्वच लेकी सुनांचे बाळंतपण याच ‘मोकदम कॅलिनीक’ मध्ये होत असे.
माझी आई सांगत असे, मोकदम कॅलिनीक येथे त्यांच्याच हातून माझा जन्म (१९६१ साली) झाला…तोही त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी – म्हणजे ५ जुलै रोजी…आणि म्हणून माझा जन्म झाल्या-झाल्या, त्यांनी माझ्या आईला सांगितले, “प्रमे, माझ्या वाढदिवशी तुला ही मुलगी झाली आहे…तेव्हा माझे नाव जर ‘अंजनी’ आहे, तर हिचे नाव ‘अंजली ‘ ठेव !”
बाई आजींनि त्याच्या नावावर माझे नाव ‘अंजली’ ठेवून, मला जणू आशीर्वादच दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने मी पण डॉक्टर झाले, असे मला नेहमीच वाटते.
वर्णाने गोऱ्यापान आणि अतिशय मोहक सौंदर्याच्या त्या धनी असून, प्रेमळ, दयाळू, शांत आणि चेहऱ्यावर सदैव स्मित असणाऱ्या, असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी कोणाला रागावून किंवा चिडून बोललेलं मी कधीच बघितलं किंवा ऐकलं नाही.
होळीच्या दिवशी, पांढरी शुभ्र साडी घालून, बाई आजी सर्वांना होळीच्या रंगांनी रंगवून, होळीचा आनंद घेत असे.
१९७२ या वर्षी, फक्त ५७ वर्षे वय असतांना, कॅन्सर ने ग्रस्त असलेल्या आमच्या ‘बाई आजी’ आम्हाला सोडून, देवाघरी निघून गेल्या…
त्या गेल्या तेव्हा मी बरीच लहान होती. पण त्यांच्या काही आठवणी अजूनही माझ्या हृदयात घर करुन आहेत….
उन्हाळ्यात आम्ही सर्व नातवंड रामदासपेठेत आजोळी येत असू. खूप धमाल यायची. बाईआजी त्यांच्या दिवसभराच्या व्यस्त वेळे पश्चात, आम्हाला कित्येकदा रात्री त्यांच्या ‘फियाट’ गाडीत बसवून, ‘सदर’ येथे दिनशा आईस-क्रीम खायला नेत असे. अनेकदा, त्यांच्या इमारतीच्या गच्चीत आम्ही त्यांच्या खाटे भोवती बसून त्यांच्या कडून गोष्टी ऐकायचो आणि सांगायचो सुद्धा.
असो, त्यांच्या असंख्य अविस्मरणीय, गोड आणि प्रेरणादायी आठवणी अनेकांच्या मनात कायम राहणार, यात शंका नाही…
दि. ३० मार्च १९७२ रोजी हनुमान जयंती च्या दिवशी, त्याचे निधन झाले होते. आज दि. २७ एप्रिल २०२१ रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी, त्यांच्या मधुर स्मृती निमित्त हा लेख….
_– डॉ. अंजली (बकाणे ) आंबटकर_
सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी,
चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर