आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या सूचना

चंद्रपूर दि. 22 एप्रिल: जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 संदर्भात अनुषंगीक कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सदर बैठक पार पडली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे-सोळंके, उपजिल्हाधिकारी (भु.) प्रियंका पवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे,
सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे,सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी शुभांगी कणवाडे यासह आरोग्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर मधील उपलब्ध बेडची माहिती जाणून घेत कोविड केअर सेंटर मधील बेड भरल्यानंतरच रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशा सूचना सुद्धा त्यांनी बैठकीत उपस्थितांना दिल्यात.

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या व्हाव्या म्हणून स्वॅब कलेक्शन केंद्राच्या कालावधी वाढवून ते दोन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवावे. टेस्टिंग टीमशी समन्वय साधून 24 तासात रुग्णाचा अहवाल मिळावा यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून अहवाल लवकर प्राप्त झाल्याने रूग्णांचे वेळेत निदान होऊन रूग्ण चांगल्या स्थितीत असतांना त्याच्यावर उपचार करणे शक्य होते. परिणामी मृत्यूदरातही घट होते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टेस्टिंग संदर्भात काही समस्या असल्यास त्यादेखील त्वरित निदर्शनास आणून द्याव्यात . दैनंदिन बाधित रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी अशा सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here