
चंद्रपूर, ता. २१ : अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या कोव्हिड-१९ विषाणू सारख्या संकटाच्या काळात लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात एकूण १४ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून एकूण ४१ हजार २१७ जणांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने सध्या शहरात केवळ दोन लसीकरण केंद्र सुरु आहेत. लालपेठ भागातील एरीया हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहे.
कोरोना लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. २० एप्रिल पर्यंत ४१ हजार २१७ जणांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील ५ हजार ५६३ योद्धांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार ३११ आरोग्य सेवकांना पहिला डोज, तर ३ हजार ३३९ जणांना दुसरा डोज देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ३ हजार ५५३ कोरोना योद्धांची नोदणी करण्यात आली. यातील ३ हजार ५३२ जणांना पहिला डोज व १७७३ जणांना दुसरा डोज देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून एकूण ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १३ हजार ९६५ डोज देण्यात आला.
तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत १८ हजार ८५६ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोज, तर ८९० नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला. तसेच ७ हजार ४०४ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर १०२ जणांना दुसरा डोज देण्यात आला. म्हणजेच एकूण ४१ हजार २१७ जणांनी पहिल्या आणि दुसऱ्या लसीचा डोस घेतला आहे. यात कोविशिल्ड ३६ हजार ३६३ तर, कोव्हॅक्सीन ४ हजार ८५४ जणांना देण्यात आली.