
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची मागणी
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. त्यामुळे दिवसागणिक हजारोच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचा आकडाही गंभीर आहे. यात चंद्रपूर शहर हॉटस्पॉट ठरले आहे. त्यामुळे शहरातील कोविड रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे कठिण झाले आहे. या गंभीर परिस्थितीत कोविड रुग्णांना आरोग्यसेवा घेणे सोयीचे व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने नवीन कोविड रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.
चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजविला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालये कोविड रुग्णांमुळे भरली आहेत. नवीन कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णालये नवीन रुग्णांना उपचारासाठी घेत नसल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेने स्वत:चे कोरोना रुग्णालय उभारले असते, तर त्याची आजघडीला शहरातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी सोयीचे झाले असते. परंतु, महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून वडगाव येथे स्वागत गेट उभारणीवर पैशाची उधळण केली जात आहे. मात्र, सुविधा अभावी अनेक कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागत असताना पदाधिका-यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्याच्या उद्देशातून नवीन कोरोना रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.