

चंद्रपूर, ता. १६ : नागरिकांच्या सोयीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. नागरिकांनी कुठल्याही एका विशिष्ट केंद्रावर गर्दी न करता सोयीनुसार गर्दी नसलेल्या केंद्रावर चाचणी करावी, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. नागरिकांना सर्व सोयी मिळाव्या, नागरिकांची फरफट होऊ नये यासाठी चंद्रपूर महानगरपालिका सर्व प्रयत्न करीत आहे. कोरोना प्रतिबंधासाठीसुद्धा पुढाकार घेत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता चाचणी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी कोव्हिड चाचणी केंद्रांची संख्याही वाढविली आहे. प्रत्येक चाचणी केंद्रावर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन व्हावे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. एकाच केंद्रावर गर्दी न करता सात केंद्रावरून नागरिकांनी चाचणी करावी आणि कोरोना प्रतिबंधासाठी सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
सहा आर.टी. पी.सी.आर. तर चार अँटिजेन चाचणी केंद्र
नागरिकांना चाचणी करणे सोयीचे व्हावे, एकाच केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सहा आर.टी. पी.सी.आर. चाचणी केंद्र तर चार अँटीजेन चाचणी केंद्राची सोय केली आहे. शहरात वन आकदमी, मूल रोड, काईस्ट हॉस्पिटल तुकुम, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अभ्यंकर प्राथमिक शाळा बालाजी वॉर्ड, भिवापूर वॉर्ड, सरदार पटेल प्राथमिक शाळा, रामनगर येथे आर.टी. पी.सी.आर. चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे .
शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ इंदिरा नगर, सरदार पटेल प्राथमिम शाळा रामनगर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ४ बगड खिडकी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ५ बाबूपेठ येथे अँटीजेन चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू
गृह विलगीकरण शक्य नसलेल्या कोव्हिड रुग्णांसाठी शहरात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मूल मार्गावरील वनराजिक महाविद्यालयात (वन अकादमी) २९० क्षमतेचे कोव्हिड केअर सेंटर सुरू आहे. आता बल्लारपूर मार्गावरील शासकीय सैनिकी शाळेत दुसरे केंद्र सुरू करण्यात आले असून त्याची क्षमता १५० खाटांची आहे. त्याठिकाणी रुग्णांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र चमू नेमण्यात आल्याची माहिती महापौर कंचर्लावार यांनी दिली.