

रामू तिवारी यांचा आरोप : काँग्रेसची मूक निदर्शने; कोरोना लस वितरणात भेदभाव
चंद्रपूर : कोरोना महामारीने आपल्यासमोर फार मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जास्तच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार मोठ्या धैर्याने व नियोजनबद्ध पद्धतीने या संकटाशी सामना करीत आहे. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी लस पुरवठा करण्यात महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत कमी लसीचा पुरवठा केला आहे. त्यामुळे सर्वत्र लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासर्व परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या निषेधार्थ शनिवारी (ता. १०) दुपारी ४ वाजताच्या सुमारास शहरातील प्रमुख सर्वच चौकांत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मूक निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रामू तिवारी बोलत होते.
केंद्र सरकारने देशातील सर्वच राज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा केला आहे. आजघडीला देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करणे अपेक्षित होते. मात्र, केंद्र सरकारने हेतुपुरस्सर महाराष्ट्राला कमी लसीचा पुरवठा केला आहे. राज्य सरकारने लस प्राप्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात केंद्रे उघडून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आजघडीला अनेक केंद्रे लसीअभावी बंद पडली आहेत. अशास्थितीत केंद्र सरकार लसीचा उत्सव साजरा करण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील शिवाजी चौक, गिरनार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, वरोरा नाका चौक आणि बंगाली कॅम्प चौकात मूक निदर्शने करण्यात आले.
या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्यासह माजी नगरसेवक प्रवीण पड़वेकर, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे, मोहन डोंगरे पाटील, पप्पू सिद्दीकी, इरफ़ान शेख, राहिल कादर शेख, केतन दुर्सेलवार, कासिफ अली, मोनू रामटेके, आकाश तिवारी, रूपेश वासेकर, मीनल शर्मा, वैभव यरगुड़े, अंकुर तिवारी सहभागी झाले होते.