
केंद्रीय स्वच्छता कमेटीचा तीन दिवसीय दौरा ठरला चर्चेचा विषय !
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिका कधी काय करेल याचा नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमी चर्चेत राहणाऱ्या चंद्रपूर शहर महानगर पालिकेने गुरूवार २५ मार्च पासून २७ मार्च पर्यंत छोट्या दुकानदारांना आपआपली दुकाने बंद ठेवण्याचे दिलेले आदेश आता चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. दिल्ली येथील केंद्रीय स्वच्छता विभागाची टिम शहरात आलेली आहे. चंद्रपूर शहरात ही टिम स्वच्छतेची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीवरून आलेल्या या टिमच्या अनुषंगानेचं लहान व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचे मौखिक आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. आधीच कोरोनामुळे रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. गोर-गरिबांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशातच त्यांची दुकाने बंद ठेवून स्वच्छतेचा कोणता उदो-उदो चंद्रपूर शहर मनपा करणार? हा संशोधनाचा विषय आहे. आपले शहर स्वच्छ असावे असे प्रत्येक जबाबदार नागरिकाला वाटतेच . परंतु ती स्वच्छता फक्त कागदोपत्री नसून प्रत्यक्षात असायला हवी. तीन दिवसांच्या स्वच्छता पाहणीसाठी गरीबांचा रोजगार हिसकावणे म्हणजे मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आपल्या ‘अकलेचे तारे’ तोडण्यासारखा प्रकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये शहरात व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना ओळखपत्र देण्याचे जाहिर केले आहे. आत्ता स्वच्छता निरीक्षणाच्या नावाखाली जर छोट्या व्यावसायिकांना तात्पुरती दुकाने बंद ठेवायचे आदेश दिले जात असतील तर गरिब दुकानदारांचा मनपा ने ‘खेळ मांडियला’ ! असेच म्हणावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे रविवार २८ ला होळी व २९ ला धुलिवंदन सारखे सण आलेले आहेत. या सणांमध्ये छोट्या व्यापाऱ्यांच्या रोजगार असतो, त्या रोजगारासाठी या छोट्या व्यवसायिकांनी सामानाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. तीन दिवसाच्या या बंदमुळे त्यांचे नुकसान झाले असून त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. मनपा प्रशासनाच्या या निर्णयामुळे गरीब व्यापाऱ्यांमध्ये मनपा विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.