रॅपिड ॲन्टीजेन चाचणीचा बनावट अहवाल देणाऱ्या ‘त्या’ ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द

मुंबई, दि. 11 : अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्हात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. तथापि, अमरावती जिल्ह्यात रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तपासणीमध्ये तफावत आढळून आली आहे. काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळीच माहिती नोंदवत नसल्याचे आणि त्यांनी दिलेले काही रिपोर्ट हे बनावट असल्याचे लक्षात आल्याने, अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.
यासंदर्भात निवेदन करताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर तसेच रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट या चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांपैकी आरटीपीसीआर ही गोल्ड स्टँडर्ड चाचणी मानण्यात येते. कारण या आरटीपीसीआर चाचणीने 60 ते 65 टक्के अचूक निदान होते. तर रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट चाचणीद्वारे 30 ते 35 टक्के इतके अचूक निदान होते.
प्रयोशाळेतील इतर कोणत्याही चाचण्यांप्रमाणे या चाचण्यांसही काही मर्यादा आहेत. लक्षण विरहीत व्यक्तींमध्ये  संसर्गाच्या प्रमाणात कमी कालावधीत वेगवेगळा निकाल दाखविण्याची शक्यता आहे. याशिवाय खालील कारणांमुळेही तफावत येऊ शकते.
दोन वेगवेगळ्या कालावधीत घेण्यात आलेले नमुन्यांमध्ये (सॅम्पल) विषाणूंची संख्या अत्यल्प असल्याने चाचणीच्या निदानात तफावत येण्याची शक्यता असते.
काही वेळा एखादा नमुना इतर कारणांमुळे देखील दूषित (contaminate) झाल्यास, निदानात नमुना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते.
तपासणीसाठी नमुना (स्वैब) घेतल्यानंतर शीत साखळीचा अवलंब व्यवस्थितरीत्या न करता नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत गेला तर विपरीत निदान होण्याची शक्यता असते.
तसेच संबंधित प्रयोगशाळा वापरत असलेल्या टेस्ट किट्सची संवेदनशिलता/अचूकता यावरही निदानाची अचूकता अवलंबून असते.
कोवीड-१९ साथरोगाच्या सुरूवातीच्या कालावधीत राज्यात एनआयए, पुणे ही एकमेव प्रयोगशाळा कोविड-१९ निदानासाठी कार्यरत होती.
तथापि, आता आयसीएमआर आणि एनएबीएल मानकानुसार पात्र असलेल्या प्रयोगशाळांना आयसीएमआरकडून मान्यता देण्यात येते. आज राज्यात ३७६ शासकीय आणि १४१ खाजगी अशा एकूण ५१७ प्रयोगशाळाना आयसीएमआरने मान्यता दिलेली आहे.
शासनाकडून कोविड-१९ निदानाचे काम करण्यात येते. या प्रयोगशाळांपैकी ९८ शासकीय आणि १२० खाजगी अशा एकूण २१८ प्रयोगशाळांकडून कोविड-१९ च्या निदानासाठी आरटीपीसीआर चाचणी पद्धतीचा अवलंब केला जातो. या प्रयोगशाळांचे काम योग्यरीत्या होण्यासाठी गुणवत्ता आणि तपासणीसाठी आयसीएमआरने कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई व एनआयव्ही, पुणे या दोन प्रयोगशाळांना मार्गदर्शनासाठी मेन्टॉर म्हणून निवडण्यात आलेले आहे.
तसेच प्रशासनाच्या संदर्भात जिल्हास्तरीय नियंत्रण अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यरत आहेत. दिनांक ०९.०३.२०२१ पर्यंत एकूण १ कोटी ७० लाख १२ हजार ३१५ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here