३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी वने राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांची विधिमंडळ समिती जाहीर

मुंबई, दि. १० : राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. समिती चार महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.
सदस्य रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल. चार किंवा सहा महिन्यात याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानुसार आज वने राज्यमंत्र्यांनी समितीची घोषणा केली.
वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधानसभा सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, सुभाष धोटे, अमित झनक, संग्राम थोपटे, आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, समीर कुणावर आणि नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here